आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नवाब मलिकांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवार, १३ जुलै रोजी फेटाळून लावला. त्यामुळे नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर व्हावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी जामीन अर्जातून केली होती. एक मुत्रपिंड निकामी झालं असून दुसरं केवळ ६० टक्के काम करत आहे. ही स्थिती आणखी बिघडत आहे, त्यामुळे योग्य पद्धतीने उपचार करता यावेत यासाठी जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी मलिक यांनी आपल्या याचिकेतून केली होती.
फेब्रुवारी २०२२ मध्ये अटकेपूर्वीपासून मलिकांना किडनीचा त्रास आहे. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी हा निकाला दिला आहे. तसेच दोन आठवड्यांनंतर त्यांच्या जामीनाच्या याचिकेवर योग्यतेनुसार सुनावणी घेण्यात येणार आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यात २३ फेब्रुवारी २०२२ पासून नवाब मलिक अटकेत आहेत.
दरम्यान, आरोग्याच्या कारणास्तव मलिकांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने फेब्रुवारी २०२२ मध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री मलिक यांना अटक केली होती.
हे ही वाचा:
दुबई, ऑस्ट्रेलियामधील किमतीत भारतात टोमॅटोंची विक्री
रोहित शर्मा, यशस्वीमुळे भारताची सामन्यावर पकड
ठाणे गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, एक अटकेत
जम्मू- काश्मिरात पाच दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
नवाब मलिक यांच्यावर आरोप काय आहेत?
मुंबईतल्या कुर्ला या ठिकाणी गोवावाला कंपाऊंडमध्ये तीन एकरची जागा आहे. ही जागा मुनिरा प्लंबर यांची होती. मुनिरा यांनी आपली जागा हडपण्यात आल्याची तक्रार मलिक यांच्या विरोधात केली आहे. नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरसोबत मिळून ही जागा हडपली, असा आरोप आहे. याच प्रकरणात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले आणि टेरर फंडिंगही केलं असे आरोप करण्यात आले आहेत. याच आरोपांखाली नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.