मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने नारायण राणेंना पाठवलेल्या नोटीशीवर तूर्तास कोणतीही कारवाई नको, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. तसेच राणेंनी या नोटीशीला उत्तर देताना ते बांधकाम नियमित करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनवणी घेऊन त्यावर पालिकेने निकाल देणं अपेक्षित आहे. हा निकाल नारायण राणेंच्या विरोधात गेल्यास त्यावर तीन आठवडे कोणतीही कारवाई करू नये जेणेकरून त्या निकालाविरोधात पुन्हा दाद मागण्याचा पर्याय नारायण राणेंकडे उपलब्ध राहील, असे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.
जुहू येथील निवासस्थानावरील पालिकेची कारवाई रोखण्यासाठी नारायण राणेंनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राणेंनी आपल्या ‘अधीश’ बंगल्यात अनेक ठिकाणी आराखड्याच्या विरूद्ध बांधकाम केल्याची माहिती यावेळी पालिकेने दिली. मात्र, पालिकेने बांधकाम नियमित करून घेण्याची संधीच दिली नाही, असा राणेंच्यावतीनं कोर्टात दावा करण्यात आला. मात्र राणेंच्या या दाव्यावर पालिकेनं आपला आक्षेप नोंदवला. एकिकडे याचिकेत दावा करायचा की बंगल्यात काहीही बेकायदेशीर बांधकाम नाही, मग बांधकाम नियमित करण्याचा प्रश्नच कुठे येतो?, असा सवाल पालिकेच्यावतीनं करण्यात आला.
नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्याविरोधात पाठवलेली नोटीस बेकायदेशीर असून ती राजकीय हेतून प्रेरीत असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता. या जागेची मालकी असलेल्या कंपनीच्या माध्यमातून राणेंनी ही याचिका हायकोर्टात सादर केली होती. नारायण राणे यांच्या पत्नी निलम आणि मोठा मुलगा निलेश संचालक असलेल्या ‘आर्टलाईन प्रॉपर्टीज’ या कंपनीच्या नावे ही नोटीस पाठवण्यात आली होती.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींही त्यांच्यापुढे झाले नतमस्तक
कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी
छत्रपतींना विरोध करणारे शिवसेना,राष्ट्रवादीचे समविचारी
न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चपराक दिल्याचे म्हणत नितेश राणे यांनी मुंबई पालिकेला टोला लगावला आहे. राज्यात सध्या कोणताही प्रश्न उरलेला नाही. फक्त तीन लोकांच्या घरांमध्ये काय चाललं आहे? याकडे सरकारचं लक्ष आहे, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. महाराष्ट्र सरकारविरोधात जो बोलेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाते. राणे, मोहित कंभोज, किरीट सोमय्या यांच्यावर फक्त कारवाई होते, अशी टीकाही नितेश राणे यांनी केला आहे.