केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली होती. निवडणुका कधी होणार आणि निकाल कधी लागणार या तारखा जाहीर केल्या होत्या. मात्र, या निवडणूक कार्यक्रमात एक छोटा बदल केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. राजस्थान राज्यातील विधानसभा निवडणूकीची मतदानाची तारीख बदलली आहे.
आधीच्या वेळापत्रकानुसार राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार होतं. मात्र, आता या तारखेत बदल करण्यात आला असून २५ नोव्हेंबर रोजी हे मतदान पार पडणार आहे. पण, निकाल मात्र आहे त्याच दिवशी म्हणजेच ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. या बदलाबाबत निवडणूक आयोगानं अधिकृत निवदेन जाहीर केलं आहे.
ECI changes the date of Assembly poll in Rajasthan to 25th November from 23rd November; Counting of votes on 3rd December pic.twitter.com/lG1eYPJ4Hg
— ANI (@ANI) October 11, 2023
या निवेदनात म्हटलं आहे की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि माध्यमांनी उपस्थित केलेल्या एका विषयाला अनुसरुन हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी निश्चित केलेल्या तारखेला म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानात लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर लोक लग्न समारंभात व्यस्त असण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे वाहतुकीची देखील समस्या निर्माण होऊ शकते. यामुळं मतदानावर परिणाम होऊन मतदानाचे प्रमाण घटू शकते. ही बाब लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो व्हायरल!
तुमच्या पुरुषार्थामुळे पदकांची प्रतीक्षा संपली!
इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला आठवला मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला
शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल
निवडणूक आयोगाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये निवडणुकींचा रणसंग्राम रंगणार आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मध्यप्रदेशातही १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २५ नोव्हेंबर (नव्या बदलानुसार) रोजी राजस्थानमध्ये मतदान होणार आहे.