राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ

राहुल गांधी यांनी आरोप करताना पुरावे द्यावे, नाहीतर माफी मागावी अशी अमित शहांची मागणी

राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू या शब्दावरून केलेल्या टिप्पणीनंतर सभागृहात शाब्दिक चकमकी उडाल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर उत्तरही दिले. ऱाहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत हल्ला केला. त्यावर लोकसभाअध्यक्षांनी आक्षेपही नोंदविला.

भाजपावर टीका करताना राहुल गांधी यांनी म्हटले की, जे आपल्य़ाला हिंदू म्हणतात ते हिंसा, द्वेष करतात आणि खोटे बोलतात. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्येच उठून टिप्पणी केली. संपूर्ण हिंदू समाजालाच हिंसक म्हणणे हा गंभीर मुद्दा आहे, असे मोदी म्हणाले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्याकडून माफीची मागणी केली.

राहुल गांधी यांनी सभागृहात महादेव, येशू ख्रिस्त, गुरुनानक तसेच इस्लामचा उल्लेख करत यात अभयमुद्राचा उल्लेख केला. आपल्या काँग्रेसचे चिन्ह म्हणजे ही अभयमुद्रा असल्याचे म्हणत प्रत्येक धर्मात अभयमुद्रेचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. पण ते सांगताना राहुल गांधी यांनी म्हटले की, आपल्या सगळ्याच महापुरुषांनी अहिंसा आणि भयमुक्ततेचा संदेश दिला आहे मात्र काही लोक स्वतःला हिंदू समजतात ते हिंसा, द्वेष, असत्य बोलतात. तुम्ही हिंदू नाहीत.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू झाला. सत्ताधारी पक्षाकडून विविध नियम दाखविण्यात आले. राहुल गांधी यांच्याकडून माफीची मागणी करण्यात आली. त्यातच पंतप्रधान मोदी उभे राहिले आणि त्यांनी राहुल गांधींच्या हिंदूंसंदर्भातील विधानाला आक्षेप घेत सगळ्या हिंदू समुदायाला हिंसक म्हणणे हे अत्यंत गंभीर आहे, अशी टिप्पणी केली. विरोधी पक्षनेत्यांच्या विधानांकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे असे संकेत असतात, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना टोमणा लगावला.

हे ही वाचा:

४२० कलमाचा अंत आता फसवणुकीसाठी कलम ३१८ !

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारच्या महिलेला घातला सात लाखांचा गंडा

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

देशभरात लागू झाले नवे तीन फौजदारी कायदे

अमित शहा यांनी नंतर राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी जाणीवपूर्वक म्हटले की, जे स्वतःला हिंदू म्हणतात ते हिंसेची भाषा करतात. त्यांना हे ठाऊक नाही की देशातील कोट्यवधी लोक हे स्वतःला हिंदू म्हणतात. एखाद्या धर्माचा संबंध अशापद्धतीने हिंसेशी जोडणे हे चुकीचे असून त्यांनी माफी मागितली पाहिजे.

राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवर टीका केली. त्यांना शहीद म्हटले जात नाही, त्यांना कोणतेही पेन्शन किंवा आर्थिक सहाय्य मिळत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

तेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना रोखत राहुल गांधी खोटेनाटे पसरवित असल्याचे म्हटले.

आपले सरकार आल्यानंतर अग्निवीर योजना रद्द केली जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले. राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निवीर शहीद झाल्यानंतर त्यांना एक कोटींची आर्थिक मदत केली जाते.

त्यानंतर राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनातील आंदोलकांना दहशतवादी म्हटले गेल्याचा आरोप केला. त्यावरूनही अमित शहा यांनी हे आरोप करताना त्यासाठी पुरावे देण्याची मागणी केली. तसेच अध्यक्षांना हे सांगितले की, आपण यासंदर्भातील पुरावे देण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांना सांगावे.

अध्यक्षांनी या सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलायचे असताना हे वेगळे विषय का उपस्थित केले जात आहेत असा सवाल विचारला असे कोणतेही विषय उपस्थित करता येत नाहीत, हेदेखील सांगितले. नीट या परिक्षेसंदर्भातील चर्चेसंदर्भात आपण वेगळी नोटीस काढू असेही ते म्हणाले.

 

Exit mobile version