राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांची आमदारकी जाणार की राहणार याचा निकाल आज, ११ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. या न्यायालयीन लढाईकडे साऱ्यांचे लक्ष असताना सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याने ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील आज कोर्टात विनंती करणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बजावलेल्या नोटिशींविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. २७ जूनला झालेल्या सुनावणीच्या वेळी ११ जुलै ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती.
हे ही वाचा:
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर
‘आरे आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर केला’
जोकोविचने विम्बल्डन जेतेपदावर सातव्यांदा कोरलं नाव!
‘मुख्यमंत्री असलो तरी, जनतेचा सेवक’
शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटाने राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार अन्य पक्षात प्रवेश न केल्याने त्यांना अपात्र ठरवावे आणि त्यांच्या पाठिंब्यावर सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य ठरवावे, या प्रमुख मागण्यांसह विविध मुद्दय़ांना आव्हान देणाऱ्या याचिका करण्यात आल्या आहेत. तर अपात्रतेच्या नोटिशींना आणि अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात केल्या आहेत. या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने ११ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली होती. मात्र, आजच्या कामकाजात हे प्रकरण यादीत नसल्यामुळे या प्रकरणी सुनावणी होणार की नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.