महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावर आज, २२ ऑगस्ट रोजी सुनावणी होती. मात्र, ही सुनावणी आता लांबणीवर पडली असून, आता ही सुनावणी मंगळवार, २३ ऑगस्टला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्रिसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार हे आज उपस्थित नसल्याने ही सुनावणी लांबणीवर गेल्याच सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १६ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली होती. त्याबाबत पिटिशनही सादर करण्यात आले होते. आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. १२ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी थेट २२ ऑगस्टला ठेवण्यात आली. मात्र, आता सुनावणीची तारीख २३ ऑगस्ट वर्तवली जात असली तरी ही सुनावणी आणखी लांबणीवर जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून, त्याआधी निर्णय होण्याची आशा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना होणार अटक?
एम्स आता ओळखले जाणार ‘या’ नावाने
इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”
शिवसेना कुणाची? शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कुणाकडे जाणार यावर हा सुनावणीनंतर निर्णय होणार आहे. महाराष्ट्रातील या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हरीश साळवे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. तसेच निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार बाजू मांडत आहेत.