शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अडसूळ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात अली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अडसूळांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे, यावर आता २५ जानेवारीपर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार आहे. अडसूळ यांचा याआधी सुद्धा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश एस.एच सातभाई यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
काही दिवसांपूर्वी अडसूळ यांनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने त्यांना कोणतीही सवलत न देता मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार,अडसूळ यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर जोवर सुनावणी होत नाही, तोवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा असा अर्ज त्यांनी केला होता. मात्र, पुन्हा एकदा त्यांना २५ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याने अडसूळ यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा:
तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा… मोदींची खोचक टीका
महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला मुख्यमंत्री?
अमिताभ, राज ठाकरे यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव…
‘महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा हा काळा आहे’
सहकारी बँकेतील कथित ९८० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी ईडीने अमरावती आणि मुंबईत त्यांच्या कार्यालयांवर आणि घरांवर छापे मारले होते. त्यानंतर या दोघांनीही चौकशीला हजार राहण्याकरिता समन्स बजावले होते. मात्र, ईडीच्या समन्सविरोधात अडसूळ यांनी वकिलांमार्फत मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टाने अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. याप्रकरणी २७ सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. त्यावेळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. काही तास त्यांची चौकशी झाली आणि त्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले.