पावसाने, पुराने ओरबाडलेल्या रत्नागिरीत गेले दोन दिवस महाराष्ट्राचे ‘विचारी, संयमी’ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा होता. या दौऱ्याचे फलित काय? यावर चर्चा होईलच, परंतु रविवारी चिपळूणमध्ये झालेल्या दौऱ्यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेली मुजोरी कोकणातील जनतेच्या जिव्हारी लागली आहे. ताठ कण्याचा कोकणी माणूस हा अपमान कधी विसरणार नाही.
पाण्याखाली गेलेल्या चिपळूणची परिस्थिती गंभीर आहे. टपापर्यंत पाण्यात बुडालेल्या एसट्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चिपळूणकरांच्या वेदना लोकांपर्यंत पोहोचल्या. एसटीच्या टपावर ९ तास मदतीची वाट पाहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा इतर चिपळूणकरांची परिस्थिती वेगळी नव्हती. लोकांचे सर्वस्व बुडाले. होत्याचे नव्हते झाले. देण्याची क्षमता असलेल्या हातांना लोकांकडून अन्न, कपडे अशी मदत घेण्याची वेळ आली. घरं, शिवारं, दुकानं सगळं बर्बाद झालं. मनात केवळ दु:ख, वेदना आणि आक्रोश होता. डोळ्यात अश्रू आणि समोर केवळ अंधार होता. मुख्यमंत्री आपले अश्रू पुसतील. काही तरी मदतीची घोषणा करतील, अशी चिपळूणकरांची भाबडी आशा होती.
उद्धव ठाकरे चिपळूणात पोहोचले तेव्हा लोकांनी गर्दी केली. परंतु ही जनता नसून मुख्यमंत्र्यांवर चालून येणारे ‘गनिम’ आहेत या अविर्भावात आमदार भास्कर जाधव त्यांच्याशी वागत होते. हातवारे करत होते. गुरांना हाकलावं तसं लोकांना दूर हाकलत होते. त्यांच्या चेहऱ्यातून सत्तेचा माज, मग्रूरी ठिबकत होती. त्यांच्या हाती तलवार नव्हती हाच काय तो दिलासा.
सर्वस्व पुरात वाहून गेलेल्या लोकांबद्दल कणभर सहानुभूतीचा लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. फक्त मुख्यमंत्र्यांवर ‘गनिमां’चे आक्रमण होणार नाही यासाठी त्यांची धडपड, धक्काबुक्की सुरू होती.
बाजारपेठेत एक महिला या अरेरावीकडे दुर्लक्ष करून जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे येत होती, तेव्हा जाधव यांनी तिच्यावर हात उगारला. ती महिला मागे हटली. परंतु लोकांचे दु:ख इतके मोठे होते की जाधवांच्या दंडेलीलाही हा आक्रोश रोखता आला नाही. रडवेल्या चेहऱ्याने दुसरी एक महिला पुढे आली. ‘काही तरी ठोस करा, पोकळ आश्वासन देऊन जाऊ नका, आमदार खासदारांचा दोन महिन्यांचा पगार तरी इथे वळवा, फुल ना फुलाची पाकळी तरी द्या…’ असा टाहो त्या महिलेने फोडला. तिच्या दुकानात पाणी शिरले होते, होत्याचे नव्हते झाले होते, तिचा संताप, दु:ख आणि आक्रोश चुकीचा होता का? मागणी गैर होती का? पण भास्कर जाधव इथेही तडमडले. त्या महिलेच्या मुलावर रेकले म्हणाले, ‘ए समजव तुझ्या आईला. पाच महिन्यांचा पगार दिला तरी तुम्हाला पुरे पडणार नाही’, अशी मुक्ताफळे उधळली.
हे ही वाचा:
लसीच्या २ डोस नंतर अजून एक डोस?
कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?
गाडी चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात
‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार
ज्या महिलेने चिपळूणकरांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर धाडसाने मांडली, ‘फक्त आश्वासने देऊन जाऊ नका’, असे सुनावले त्यांचे नाव स्वाती भोजने आहे. शिवसेनेचे माजी आमदार बापू खेडकर यांची ही पुतणी. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी हा एकप्रकारे घरचा आहेर होता. संकटांचा पहाड कोसळून सुद्धा जिने चिपळूणकरांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर निर्भीडपणे मांडल्या अशा या भगिनीसमोर आम्ही नतमस्तक आहोत.
ठाकरे सरकारच्या कार्यक्षमतेवर सवाल उठवणारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा असा आणखी एक व्हीडीयो व्हायरल झाला आहे. परंतु हा संताप, हा आक्रोश समजून घेण्याइतके हे सरकार संवेदनशील नाही.
आपल्या डोळ्यांसमोर लोकांना गुरासारखी वागणूक देणाऱ्या आमदाराला मुख्यमंत्री रोखत का नाहीत, झापत का नाहीत? असा प्रश्न लोकांच्या डोळ्यांत होता. परंतु ‘शांत आणि विचारी’ मुख्यमंत्री जाधवांच्या लीलांकडे दुर्लक्ष करीत राहीले.
चिपळूण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिलासा देणारी एकही घोषणा केली नाही, कुणाला जवळ घेऊन त्यांचे डोळे पुसले नाहीत. मग मुख्यमंत्री चिपळूणात गेले कशाला होते? भुजच्या भूकंपानंतर डोळे पाणावलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांची अशावेळी आठवण आल्याशिवाय राहात नाही.
काँग्रेसने कोकणाला कायम दुर्लक्षित केले. परंतु कोकणाचे दुर्दैव एवढे मोठे की, कोकणावर झालेल्या अन्यायाचीही कधी चर्चाही होत नाही. याबाबतीत विदर्भ कोकणापेक्षा भाग्यवान म्हणावा लागेल.
अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या कोकणातल्या आंबे-काजू व्यावसायिकांना सरकारने नुकसान भरपाई दिल्याचे कधी ऐकले आहे? काँग्रेसला कोकणात कधी स्वारस्य नव्हतेच पण शिवसेनेची गोष्ट वेगळी. कोकणी माणसाने शिवसेनेला भरभरून दिले. शिवशाही सरकारमध्ये झालेले दोन्ही मुख्यमंत्री कोकणचे सुपुत्र होते. मुंबई-ठाण्यात शिवसेनेला बळ दिले ते कोकणातल्या चाकरमान्यांनी. शिवसेनाप्रमुखांनी कोकणावर आणि कोकणी माणसावर अपार प्रेम केले. या पुराच्या निमित्ताने कोकणी माणसाचे ऋण फेडण्याची आयती संधी शिवसेनेला मिळाली होती. परंतु भास्कर जाधव यांनी त्या संधीवर माजोरीपणा करून पाणी ओतले.
तौक्ते वादळाच्या जखमा अजून भरलेल्या नाही. त्यावेळी ज्यांनी गमावले त्याची भरपाई अजून झालेली नाही. त्यात या पुराने कोकणाला नवा तडाखा दिला. लॉकडाऊन, वादळामुळे आधीच कोलमडलेल्या व्यापारी वर्गाला साफ आडवे केले. ‘तीस वर्षांपूर्वी उमेदीच्या काळात कर्ज काढून व्यवसाय सुरू केला, पुन्हा तिथेच पोहोचलो.’ अशी खंत डोळ्यात पाणी आणून एकाने सांगितली. याच वेदना अनेकांच्या आहेत.
‘आम्ही उपाशी आहोत, आमच्याकडे अन्न नाही, कपडे नाहीत, आम्हाला मदत करा’, अशी व्यथा डोळ्यात पाणी आणून व्यापारी मुख्यमंत्र्यांकडे मांडत असताना शिवसेनेचा आमदार माजोरीची तलवार चालवत लोकांच्या जखमांवर मीठ चोळत होता. व्यापाऱ्यांसमोर हात जोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रोखत होता. अरे ज्यांच्या जीवावर सत्तेवर येता त्यांच्यासमोर कसला माज दाखवता?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळीये गावाला भेट दिल्यानंतर ज्यांची घरे दरड कोसळून उद्ध्वस्त झाली, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधून देण्याची घोषणा केली. लोकांना दिलासा दिला. उद्योगक्षेत्रात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशी एखादी घोषणा करता आली असती. कोरोनाच्या काळात जेव्हा जनतेला गरज होती तेव्हा ठाकरे सरकारने तिजोरीत पैसा नाही असे कारण देत नेहमीच काखा वर केल्या. आमदार निवासाचे आणि अशी अनेक टक्केवारीसाठी सोयीची टेंडर काढताना मात्र सरकारला ही समस्या जाणवली नाही. सरकार अगदीच भिकेला लागले आहे, असे गृहीत धरले तरी कर्ज काढण्याचा पर्याय सरकारकडे आहे, परंतु कोरोनो असो वा तौक्ते वादळ ठाकरे सरकारने लोकांच्या मदतीसाठी हात सैल सोडला नाही. कर्मदरिद्रीपणा इतका की कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री फंडात आलेला पैसाही सरकारला पूर्ण खर्च करता आला नाही.
लोक दुर्दैव आणि सरकारी ढिम्मपणाच्या वरवंट्याखाली भरडला जात असताना मीडिया तोंड आवळून बसला आहे. लोकांच्या बाजूने उभे राहून ठाकरे सरकारला जाब विचारण्याचे धाडस जाहीरातीकडे डोळे लावून बसलेल्या मीडियाकडे नाही. पुरात उतरलेल्या गिरीश महाजनांवर टीकेचे आसूड ओढणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझा’ चॅनेलने भास्कर जाधवांच्या दंडेलीविरुद्ध ब्र काढला नाही. वर्तमानपत्रात बोटभर बातमी नाही. उत्तराखंडमध्ये भाजपाच्या आमदाराने घोड्याला मारले म्हणून अग्रलेख खरडणारे उचले संपादक, अशा वेळी नेमके कुठे पालथे पडलेले असतात? लोकांच्या समस्यांवर आवाज उठवण्याचे सोडून सत्तेवर असलेल्यांचे बुटपॉलिश करण्यावर मीडियाचा भर आहे.
हे ही वाचा:
येडियुरप्पा अखेर पायउतार होणार
…आणि नवनीत राणांना अश्रू अनावर झाले
कारगिल हुतात्म्यांना देशवासियांकडून श्रद्धांजली
निकषांचा विचार न करता तातडीची मदत जाहीर करा
यापूर्वीच्या अनुभवाप्रमाणे ठाकरे सरकारने पुन्हा एकदा आश्वासनांची पाने लोकांच्या तोंडाला पुसली असती तरी काही काळाने लोक विसरले असते. पण जखमांवर चोळलेले मग्रुरीचे मीठ लोकांच्या मनात कायम ठसठसत राहील. भास्कर जाधवांचे प्रताप कोकणी माणूस विसरणार नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)