इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल या अमेरिकेतील भारतविरोधी आणि भारतद्वेष्ट्या संघटनेच्या मंचावर भारतावर टीका करणारे, भारताची प्रतिमा खराब करणारे वक्तव्य केल्याबद्दल माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर चहुबाजुंनी झोड उठली आहे.
भारतात भाजपाचे सरकार आल्यापासून अन्सारी यांनी अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये करत आपल्या मनातील मोदी सरकारबद्दलचा द्वेष जाहीर केलेला आहे. त्यात आता या त्यांच्या नव्या वक्तव्याची भर पडली आहे. या कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाइन द्वेषपूर्ण विचार मांडताना अन्सारी म्हणतात की, नजिकच्या काळात आम्हाला काही काही प्रथा, परंपरांचा उदय झाल्याचे पाहायला मिळते, ज्या प्रस्थापित नागरी राष्ट्रवादाच्या तत्त्वांविरोधात वाद उत्पन्न करणाऱ्या आहेत. तसेच नव्या आणि आभासी परंपरा, प्रथा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली तयार केल्या जातात, ज्यामुळे नागरिकांत धर्मावरून भेदभाव निर्माण होतो तसेच असहिष्णुतेला वाव दिला जातो आणि असुरक्षित वातावरण तयार केले जाते.
यावरून भारतीय जनता पार्टीने अन्सारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी अन्सारी यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे.
ते म्हणाले की, जी संघटना भारतविरोधी कारवायांत, भारताची बदनामी करण्यात सहभागी असते अशा संघटनेच्या मंचावर अन्सारी सहभागी होतात. अन्सारी यांनी एकेकाळी भारताच्या संवैधानिक पदावर काम केलेले आहे. अन्सारी यांनी भारतातील अल्पसंख्याकांच्या अवस्थेवर ज्ञान पाजळण्यापेक्षा ज्या देशाकडून इंडियन अमेरिकन मुस्लीम संघटनेला आर्थिक मदत केली जाते, त्या देशात (पाकिस्तान) अल्पसंख्याकांवर काय अन्याय होतात, याबद्दल बोलायला हवे होते. अन्सारी यांच्या अशा वागण्यामुळेच त्यांना भारतातील लोक फारसे गांभीर्याने घेत नाहीत.
भाजपा नेते शाहनवाझ हुसेन यांनी म्हटले आहे की, देशातील मुस्लिमांना भारतासारखा दुसरा देश, नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता आणि हिंदूंसारखे मित्र मिळणे कठीण आहे. भारतविरोधी प्रचार करणाऱ्या इंडियन अमेरिकन मुस्लिम संघटनेच्या मंचावर जाण्याला अन्सारी यांनी नकार द्यायला हवा होता. ते उपराष्ट्रपती असले तरी त्यांनी केलेल्या या विधानांमुळे भारतातील लोक त्यांना कधीही क्षमा करणार नाहीत.
विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सचिव सुरेंद्र जैन यांनीही अन्सारी यांच्यावर टीका केली आणि त्यांचे हे विधान निषेधार्ह, दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. जैन म्हणाले की, जे मुस्लिम बहुल देश आहेत, तेथे मुस्लिम शांततेत नांदत आहेत का? शिया, अहमदिया हे पाकिस्तानात शांततेत राहात आहेत का? अफगाणिस्तान, सिरिया, इराक याठिकाणी काय स्थिती आहे? मुस्लिम शांततेत राहू शकतील, असे कोणते मॉडेल अन्सारी यांच्याकडे आहे का?
हे ही वाचा:
माहीमच्या बांधकाम व्यावसायिकाला गँगस्टर गुरू साटमच्या नावे फोन
महाराष्ट्रात आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन
काल्का शिमला रेल्वे मार्गावर बर्फाचे पांघरूण
या परिषदेत अमेरिकेतील काही भारतद्वेष्टे सिनेटर सहभागी झाले होते, त्यांनीही भारताविरोधातच गरळ ओकली. एड मार्के अमेरिकन सिनेटर म्हणाले की, भारतात असे वातावरण तयार होत आहे जिथे भेदभाव आणि हिंसेला वाव मिळण्याची शक्यता वाढली आहे. सध्याच्या काळात द्वेष पसरविणारी ऑनलाइन भाषणे आणि घटनांची संख्या वाढताना आपण पाहात आहोत. त्यात मशिदींत तोडफोड, चर्चेसना आगी लावणे, धार्मिक दंगलींमध्ये वाढ होत आहेत.
भारतात धार्मिक भेदभाव होतो आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतात लोकशाहीला तडा जात आहे आणि मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. धार्मिक राष्ट्रवादाला खतपाणी मिळत आहे. असे दुसरे सिनेटर जेमी रस्कीन यांनी म्हटले होते.