फारुख अब्दुलांच्या नॅशनल कॉन्फरन्सविरोधात गुलाम नबींनी थोपटले दंड

नॅशनल कॉन्फरन्सचे मिलान अल्ताफ अहमद यांच्या विरोधात निवडणूक

फारुख अब्दुलांच्या नॅशनल कॉन्फरन्सविरोधात गुलाम नबींनी थोपटले दंड

माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद जम्मू काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून त्यांच्या डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाच्या (डीपीएपी) वतीने निवडणूक लढवणार आहेत. तशी घोषणा त्यांच्या पक्षाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली. ‘अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून डीपीएपीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद साहिब निवडणूक लढवणार आहेत. आज डीपीएपी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला,’ असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते सलमान निझामी यांनी ‘एक्स’वर जाहीर केले.

डीपीएपीचे उमेदवार म्हणून आझाद हे इंडिया गटाचे उमेदवार नॅशनल कॉन्फरन्सचे मिलान अल्ताफ अहमद यांच्या विरोधात निवडणूक लढतील. नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीमध्ये यशस्वी वाटाघाटी होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसतर्फे प्रयत्न केले जात होते. मात्र ते अपयशी ठरले. तसेच, ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या वतीने पीपल्स अलायन्स फॉर द गुपकार डिक्लेरेशन (पीएजीडी) आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र तेही अपयशी ठरले आहेत. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा मिळावा, या मागणीसाठी ही संघटना स्थापन झाली आहे.

हे ही वाचा:

यूपी पोलीस पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड ताब्यात!

पाँडिचेरी विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या प्रमुखांना दणका

‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले

तैवानला ७.२ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; गेल्या २५ वर्षातील शक्तीशाली भूकंप

मेहबुबा मुफ्ती या अनंतनाग सोडून देण्यास तयार नव्हत्या. हा मतदारसंघ पीडीपीचा बालेकिल्ला मानला जातो. येथून कदाचित त्या स्वतःच उभ्या राहण्याची शक्यता आहे. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मतसंख्येत त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. ही जागा पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. भाजपतर्फेही या मतदारसंघासाठी कसून तयारी केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांना येथून उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे हस्नैन मासूदी हे या मतदारसंघाचे खासदार आहेत.

Exit mobile version