मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी उठाव केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सातत्याने उठाव केलेल्या आमदारांवर गद्दार असल्याची टीका करत आहेत. यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्ही गद्दार नाही तर आम्ही खुद्दार आहोत,” असे खडे बोल गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले आहेत. यासोबतच गुलाबराव पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे.
“गुवाहाटीला जाण्याआधी उद्धव ठाकरेंकडे २० आमदार घेऊन गेलो होतो पण त्यांनी ऐकलं नाही. सर्वात आधी मी शिंदे यांच्यासोबत गेलो नव्हतो, ३२ आमदार गेल्यानंतर मी शिंदे गटात सहभागी झालो. शिवाय तिथे जाण्यापूर्वी मी एकटा नाही तर मी २० आमदार घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो मात्र तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्याची दखल घेतली नाही,” असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरेंनी त्यावेळी शिवाजी महाराज जसे तह करायचे तसा तह केला असता, तर ही वेळ आली नसती. आदित्य ठाकरे हे तरुण होते त्यावेळी त्यांनी आता करत आहेत तसे राज्यभर दौरे करायला हवे होते, अशी आमची अपेक्षा होती मात्र त्यांनी तसं केलं नाही,” अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
हे ही वाचा:
बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या
मुंबई हल्ला धमकी प्रकरणी वसईतून न्हाव्याला घेतलं ताब्यात
मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर
१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?
“शिवसेना वाचवण्यासाठीच आम्ही प्रयत्न केला. मात्र, शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न त्यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र, आम्ही गद्दार नाही तर आम्ही खुद्दार आहोत,” असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.