शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य
शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील हे १३ दिवसांनी जळगावात आले. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मोठे विधान केले आहे. येणाऱ्या काळात शिवसेना म्हणून आमच्या गटाला मान्यता मिळेल आणि संख्याबळाच्या जोरावर धनुष्यबाण चिन्हं आम्हाला मिळेल, असं विधान त्यांनी केलं आहे.
गुलाबराव पाटील हे जळगावात येताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी उठाव केला. आम्ही बंड केलेलं नाही. शिवसेनेचं जळणारं घर वाचवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. विधानसभेत शिवसेना गट म्हणून आम्ही बसलो आहोत. येणाऱ्या काळात शिवसेना म्हणून आमच्या गटाला मान्यता मिळेल आणि संख्याबळाच्या जोरावर धनुष्यबाण चिन्हं आम्हाला मिळेल, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक
ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला…
उद्धवजी, मुर्मूना पाठिंबा द्या! खासदार राहुल शेवाळे यांचा लेटरबॉम्ब
शिवसेना ही आमचीच असून संजय राऊत यांना आम्ही निवडून आणलंय. त्यांनी खासदार पदाचा राजीनामा द्यावा आणि मग बोलावं, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार आणि २० माजी आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला. उद्धव ठाकरेंना आम्ही सोडलं नाही तर त्यांनी आम्हाला सोडलं. वेळोवेळी उद्धव ठाकरेंना सांगूनही त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला, असं गुलाबराव म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवणार आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. उलट शिवसेना वाचवली आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.