भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून प्रामुख्याने राज्यपालांनी राष्ट्रपतींना सत्य अहवाल पाठवावा आणि मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबतचा एक सत्य अहवाल अधिकाऱ्यांकडून मागवून घ्यावा अशी विनंती केली.
महाराष्ट्रात सध्या घडलेली घटना गंभीर असून याबाबत उच्चस्तरिय चौकशी समितीची गरज निर्माण झाली आहे असे ते म्हणाले. त्याबरोबरच परवा राज्यपालांशी भेट घेऊन त्यांनी याबाबत सत्यता अहवाल मागवून घ्यावा अशी विनंती देखील करणार असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत मतभेद?
यावेळी ते म्हणाले की पत्रात वर्षा निवासस्थानावर देखील माहिती दिली असा स्पष्ट उल्लेख आहे. मग मुख्यमंत्री महोदयांनी अजूनपर्यंत एक प्रसिद्धीपत्रक देखील का काढलं नाही, असा प्रश्न उपस्थिती होतो. त्याबरोबरच ज्या अधिकाऱ्याशी झालेला व्हॉट्सअप चॅट पत्रात नमूद केला आहे, त्याने देखील या आरोपाचे कुठे खंडन केले नाही, ज्या अधिकाऱ्यांची नावे या पत्रात आहेत ते देखील चूप आहेत, त्याशिवाय दारू व्यावसायिकही चूप आहेत. त्यामुळे या पत्राचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे, तो होताना दिसत नाही मत त्यांनी व्यक्त केले.
काही परिस्थितीजन्य पुरावे देखील उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. एरवी आमच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगणारे सरकार दारू व्यवसायिकांच्या लायसन्समध्ये मात्र सूट देत होते. त्यामुळे ही सूट या खंडणीशी जोडली होती का अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली.
विधानसभेत बोलताना विविध मंत्री महोदय कशा प्रकारे वकिलपत्र घेतल्यागत सचिन वाझे यांच्या बचावात गुंतले होते. त्याबद्दल देखील त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. यावेळी बोलताना त्यांनी पोलिसांना जर कोणी खंडणी यार्ड करत असेल तर आपण ते ठेचून काढलं पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना देखील समोर येऊन त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून शक्य असल्यास नावासकट किंवा निनावी, परंतु पुराव्यासकट आपल्यावर कोणकोणत्या प्रकारचे दबाव टाकले जात आहेत, याची माहिती राज्यपालांना द्यावी असे आवाहन केले. या माहितीच्य आधारे, राज्यपालांनी देखील एक सत्य अहवाल तयार करून तो राष्ट्रपतींना सादर करावा असे ते म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात सप्टें. १९८० सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असेही ते म्हणाले. या संवादात त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, मी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाही. मी फक्त राज्यपालांनी सत्यकथन करणारा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवावा असे म्हणणे आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी बोलताना त्यांनी सांगितले की, परवा चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची या संदर्भात भेट घेतली जाणार आहे.