राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ; राज्यपाल सभागृह सोडून निघाले

राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ; राज्यपाल सभागृह सोडून निघाले

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अनेक मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता असतानाच आता राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ सुरू झाला. भाषणादरम्यान गोंधळ झाल्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण सोडून राज्यपाल सभागृहातून निघून गेले. अवघ्या २२ सेकंदात राज्यपालांनी आपलं भाषण आटोपत घेतले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषणासाठी सभागृहात येताच सत्ताधारी नेत्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणाबाजी केली. यानंतर राज्यपाल यांनी अवघ्या २२ सेकंदात भाषण पटलावर ठेवत थांबवलं. त्यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे नाव घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अधिकच घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र त्यानंतर पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले.

हे ही वाचा:

अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात; हे मुद्दे गाजण्याची शक्यता

आता बाजारात येणार पतंजलीचे क्रेडिट कार्ड

दरम्यान, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांनी अधिवेशन सुरू करण्यापूर्वी आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. ईडीच्या कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपा नेते किरीट सोमय्यांवर झालेले आरोप, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरील कारवाई, केंद्रीय यंत्रणांचा वापर अशा अनेक मुद्द्यांवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

Exit mobile version