राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत असताना वादग्रस्त विधान केले आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे.
शुक्रवार, २९ जुलै रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं राज्यपाल म्हणाले.
राज्यपालांनी हे वक्तव्य केल्यानंतर सामान्यांनी नाराजी व्यक्त केली असून विरोधकांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत राज्यपालांवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे, राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी
बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने
मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द
“तरुण देशाचे तर भारत जगाच्या विकासाचे इंजिन”
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, “ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही, महाराष्ट्राचा आपल्याला इतिहास माहिती नाही तर नको त्या गोष्टीत राज्यपालांनी आपलं नाक खुपण्याची गरज नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले- शाहू- आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे. इथं बाकी लोक आले आणि स्वतःची प्रगती करुन घेतली. १०५ हुताम्यांमुळे मुंबई महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळं ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नाही तर नको त्या गोष्टीत त्यांनी नाक खुपसू नये,” अशी टीका संदीप देशपांडे यांनी मांडले आहे.