देशात लवकरच साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या २० सैनिकांचे नाव, लवकरच राष्ट्रीय युद्ध स्मारकावर लिहिले जाणार आहे. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून २०२० रोजी झालेल्या लढाईत हे सैनिक हुतात्मा झाले होते.
येत्या काही महिन्यातच त्या सर्वांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भारत आणि चीन मधील गेल्या पन्नास वर्षातील सर्वात भयकारी लढाई १५ जुन रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात लढली गेली होती. कर्नल बी सुभाष बाबू १६ व्या बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर हे या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांपैकी एक होते.
या घटनेमुळे भारत- चीन संबंध पूर्व लडाख सीमेबाबत तणावग्रस्त झाले आहेत. भारताने या घटनेला पुर्वनियोजित हल्ला म्हटले आहे.
चीनी सैनिकांनी या भ्याड हल्ल्यावेळी दगड, लोखंडी सळई, खिळे ठोकलेल्या काठ्या यांचा वापर केला. चीनने उभ्या पॉईंट १४ वरच्या टेहळणी नाक्याचा निषेध करणाऱ्या भारतीय सैन्यावर चीनी सैनिकांनी हल्ला केला होता.
त्यांनतर भारतीय सैन्याने जोरदार प्रतिहल्ला केला. यात अनेक चीनी सैनिक मारले गेले असले, तरीही आजतागायत चीनने त्यांची नेमकी संख्या उघड केलेली नाही. मात्र अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार ही संख्या ३५ आहे.