सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत शिवजयंतीनिमित्त बाईक रॅली किंवा मिरवणुका न काढण्याचा फतवा काढला आहे. एका बाजूला मुंबईतील बेस्ट, लोकल गर्दीने खचाखच भरून जात आहेत, त्यावर सरकार काही उपाययोजना करू शकलेले नाही.
राज्यातील कोरोनाचा कहर आता उताराला लागला आहे. दिवसेंदिवस नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. राज्यातील एक एक सुविधा सामान्यांसाठी हळूहळू उघडण्यात येत आहे. मात्र तरीही सरकार शिवजयंतीच्या उत्सवावर निर्बंध लादण्यात मग्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेच्या सरकारने या दिवशी कोणत्याही प्रकारची बाईक रॅली, मिरवणुका काढण्यास मनाई केली आहे. अनेक शिवप्रेमी, देशप्रेमी संघटनांकडून १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत त्यावर निर्बंध लादले आहेत.
सरकारने त्यासाठी विविध मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. सरकारने कोरोनाविषयक खबरदारीच्या उपायांना २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे १९ तारखेला येणाऱ्या शिवजयंतीवर देखील निर्बंध आले आहेत. यादिवशी अनेक इतिहासप्रेमी, समाजसेवी, शिवप्रेमी संघटनांतर्फे व्याख्याने, गडांवरील सफरी, मिरवणुका यांचे आयोजन केले जाते. कोरोनाचे कारण पुढे करून सरकारने ही शिवजयंती साधेपणाने, मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साजरी करावी असे सांगितले आहे. व्याख्याने व इतर कार्यक्रमांचे ऑनलाईन आयोजन करावे असेही सुचवण्यात आले आहे. एका वेळी दहापेक्षा अधिक लोकांनी एकत्र न येण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याबरोबरच, या दरम्यान नव्या सुचना जारी करण्यात आल्यास त्यांचेही पालन करावे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शिवभक्तांचा अपेक्षाभंग झाला आहे.
सरकारच्या या भूमिकेवरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. एका बाजूला सरकार मदिरालये, पब, हॉटेल, सिनेमागृहांना परवानगी देत असताना हिंदूंच्या सन्मानाचे स्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथी दिवसाबाबत अशी दुटप्पी भूमिका घेत आहे. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटरवरून राज्य सरकारवर टिका केली आहे.
शिवजयंती दिनी बाइक रॅली, मिरवणुकांना मनाई…
बार, रेस्टॉरंट, हॉटेल, पब, नाईट लाईफची चिंता करणाऱ्या राज्य सरकारची शिवजयंतीवर बंधने… pic.twitter.com/ct9mNGKJgY— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 11, 2021