27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारण"सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न"

“सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न”

Google News Follow

Related

२१ फेब्रुवारी २०२१ चे फेसबुक लाईव्ह उत्तम होते अशी कोपरखळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना मारली. मुख्यमंत्री म्हणाले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही.
नेमके हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण, तुम्हीच सांगितले हे बरे केले, असा टोलाही लगावला. एकेक करून सरकारचे अपयश वेशीवर टांगून फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर घणाघाती टीका केली.

सगळ्यात आधी फडणवीसांनी कोविड-१९ च्या हाताळणीचा समाचार घेतला. “महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या ९ टक्के आहे पण तरीही देशातील कोविड-१९ मुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३३-३४ टक्के मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत. देशात एकूण एक लाख ५७ हजार मृत्यू झाले यातले ५२ हजार मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. कोविड-१९ च्या हाताळणीमध्ये नक्की कोणाचं ऐकत होतात? कोणत्या डॉक्टरचं ऐकत होतात? का राऊतसाहेब (संजय राऊत) म्हणाले होते तसं कम्पाउंडरचं ऐकता? नक्की कोणत्या आकड्यांच्या आधारावर आपण कोविड -१९ च्या प्रश्नावर स्वतःची पाठ थोपटताय?” असे सवाल फडणवीस यांनी केले.

कोविड-१९ च्या काळात अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झाले असा आरोपही त्यांनी केला. “कोविड काळात विक्रमी वेळात हॉस्पिटल उभारली असं तुम्ही म्हणालात पण त्यात विक्रमी भ्रष्टाचार केलात. हजार खुर्च्यांच भाडं साडेचार लाख रुपये, एका फॅनच भाडं नऊ हजार रुपये अशा अनेक प्रकारे भ्रष्टाचार करण्यात आला आहे. ज्यांना कंत्राटं देण्यात आली ते कोणाच्या ओळखीचे लोक आहेत याचाही तपास व्हायला हवा. मुख्यमंत्री म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता म्हणतात मी जबाबदार, म्हणजे अर्धी जबाबदारी जनतेची आणि अर्धी जबाबदारी मोदींची, तुमची जबाबदारी काहीच नाही. अशी या सरकारची स्थिती आहे.” अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्ला केला. “आता कशाच्या आधारावर लॉकडाऊन करताय? ज्याच्या मनात येईल तो लॉकडाऊन करेल ही पद्धत सुरु आहे.” असंही ते म्हणाले.

“महाराष्ट्र सरकारला मंदिरं उघडली की कोविड-१९ वाढलेला दिसतो, शिवजयंतीला शिवभक्त एकत्र जमले की कोविड-१९ दिसतो, वरळीत आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात सुरु असलेले बार आणि पब नाही दिसत. तिथे कोरोना होत नाही, पण देवळात गेल्यावर कोरोना होतो.” असे सांगत त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवरही हल्ला केला.

हे ही वाचा:

“आदित्य ठाकरेंच्या सांगण्याने पब आणि बार बिनधास्त सुरु”- देवेंद्र फडणवीस

“पुण्यामध्ये एल्गार परिषदेत शार्जील उस्मानी येतो आणि हिंदू समाजाला सडका म्हणून जातो, पण त्याच्यावरही कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही. कारवाई कोणावर करणार? कारवाई भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर होणार. त्यांनी भारताच्या बाजूने आणि भारत विरोधी प्रॉपगॅन्डाविरुद्ध ट्विट केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची भाषा होते. भारताच्या बाजूने बोलण्यासाठी जर भाजपाच्या आयटी सेलने सेलिब्रेटींना सांगितलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे.” असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

हिंदुविरोधी ‘एल्गार’

“सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होतात पण पोलीस कारवाई करत नाहीत. पोलिसांवर दबाव आणला जातो. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये बारा ऑडिओ क्लिप्स समोर आल्या आहेत, एवढा पुरावा कोणत्याही केसमध्ये नसतो, तरीही संजय राठोड यांना अटक होत नाही. अटक होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणला जातो. वानवडी पोलीस ठाण्याचे सिनियर पीआय यांना सस्पेंड केलं पाहिजे.” अशी मागणीही फडणवीसांनी केली.

हे ही वाचा:

“सिनिअर पीआय दीपक लगड यांना चालवणारा बाप कोण आहे? हे आम्ही शोधून काढू”

मुंबई मेट्रोच्या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, “मुंबई मेट्रोच्या कारशेडचं काम पर्यावरणाच्या नावाखाली थांबवलं गेलंय. परंतु जेवढी झाडं कापली ती झाडं त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन (हरितवायू शोषून घेणे) करतात तेवढं मेट्रो सुरु झाल्यावर ८० दिवसात होणार आहे. शिवाय कारशेड कांजूरमार्गला नेल्यामुळे, जागेच्या मालकीचा मुद्दा आपण बाजूला जरी ठेवला, तरी तिथे कारशेड उभा करायला ४ वर्ष लागणार आहेत. जी मेट्रो या वर्षात मुंबईकरांना मिळणार होती ती मेट्रो अजून किमान ४ वर्ष मुंबईकरांना मिळणार नाही. म्हणजे पर्यावर्णाचंही नुकसान, पैशाचाही अपव्यय आणि जनतेला मेट्रोही नाही हा या सरकारचा कारभार आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा