राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरुन काही गौप्यस्फोट करत सत्ताधाऱ्यांना चांगलाच धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन हिच्या तक्रारीची प्रत सभागृहात वाचून दाखविली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगली कोंडी झाली. विरोधकांचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा बाहेर काढला. मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक भाजपा नेत्यांची नावे असल्याचा दावा अनिल परब यांनी केला.
तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न लावता आमच्याकडे मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटची प्रत असल्याचे सांगितले. या सुसाईड नोटमध्ये एकाही भाजप नेत्याचे नाव नाही. मोहन डेलकर यांनी प्रशासक असा उल्लेख केला आहे. त्यांनी कुठेही भाजप नेत्यांची नावे लिहलेली नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या या चोख प्रत्युत्तरामुळे सत्ताधारी आमदारांना शांत बसावे लागले. अखेर आमदारांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
हे ही वाचा:
विमला हिरेन यांच्या तक्रारीची प्रत आणि डेलकर यांची सुसाईड नोट देवेंद्र फडणवीस यांच्या हाती पडलीच कशी, असा प्रश्न आता सत्ताधाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सनसनाटी आरोपांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी गटाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अनिल परब, एकनाथ शिंदे, अजित पवार, अनिल देशमुख हे नेते हजर असल्याचे समजते.