मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला विश्वास

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी जालनामधील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे पाटलांना ज्यूस पाजून उपोषण मागे घ्यायला लावले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांचे विशेष कौतुक केले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील सरकारची भूमिका काय असेल हे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणतात, पोरगा भारी आहे

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जरांगे पाटील, त्यांची टीम, त्यांचे कुटुंबीयांना मी धन्यवाद देतो. जरांगे पाटील यांच्या वडिलांना मी सांगितलं की, त्यांचा पोरगा भारी आहे. तो समाजासाठी लढत आहे. तो समाजासाठी लढतोय, यामध्ये त्यांचा वैयक्तिक फायदा नाही, मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी सरळ भूमिका मांडली. हेतू प्रामाणिक असला की जनता प्रमाणिकपणे मागे उभी राहते. त्यामुळेचं सर्वांनी जरांगेना पाठिंबा दिला. त्यांना उपोषण सोडण्याची मागणी केली आणि त्यांनी माझ्या हातून सरबत घेतले त्याबद्दल त्यांचे आभार, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध

एकनाथ शिंदे म्हणाले की, “मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे. मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत. त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे, कुणावरही अन्याय न करता आम्ही ते देणार. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.”

“सरकारने याआधी मराठा समाजाला १६ आणि १७ टक्के आरक्षण दिलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यालायामध्ये हे आरक्षण रद्द झालं. जेव्हा आरक्षण रद्द झालं त्यावेळी ३ हजार ७०० मुलांच्या मुलाखती झालं होत्या, त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडसं आमच्या सरकारने केलं. जे फायदे ओबीसीला मिळतात ते फायदे मराठ्यांना देण्याचं काम आम्ही केलं. पण, रद्द झालेलं आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे, अशी भूमिका सरकारची आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या पुढील भूमिकेची दिशा ठरलेली

मंत्रिमंडळाची बैठक आणि सर्व पक्षीय बैठकीत आम्ही मराठा आरक्षणावर चर्चा केली आहे. या बैठकीत पुढील कृती आणि दिशा ठरवली आहे. आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. हा प्रश्न लवकर मार्गी लावू. तुमचाही एक सदस्य शिंदे समितीत द्या म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत राहतील आणि तुमच्या सूचनांचाही समितीच्या कामकाजात समावेश केला जाईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी दिला. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असतील, काहींकडे नसतील त्यांना न्याय देण्यासाठी जस्टीस शिंदे यांची समिती स्थापन केली आहे. त्यांचं काम सुरू झालं आहे. एक बैठक झाली आहे.

हे ही वाचा:

चिनी शिष्टमंडळाचा २० बॅगा हॉटेलच्या खोलीत नेण्यासाठी आग्रह होता

बिहारमधील ‘वैशाली’ लोकशाही उत्सवात प्रियदर्शी दत्तांच्या पुस्तकाचे प्रकाशन

उद्धव ठाकरे यांच्या लंडनमधील प्रॉपर्टीवर शिक्कामोर्तब

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे

मनोज जरांगे पाटलांची दिल्लीत चर्चा

काही दिवसांपूर्वी दिल्लीत गेलो होतो. तिथेही मनोजचीच चर्चा. मला काही लोक म्हणाले, ये मनोज जरांगे पाटील है कौन? मी म्हटलं, वो एक कार्यकर्ता आहे. तेव्हा ते म्हणाले अरे उसने तो सब को हिला दिया है. मनोज मी तुला हे का सांगतोय. कारण तू साधा कार्यकर्ता आहेस. तुझी दखल उच्च न्यायालयानेही घेतली आहे, असा एक किस्सा एकनाथ शिंदेनी यावेळी सांगितला.

मराठा समाज आणि सरकार काही वेगळं नाही. प्रोटोकॉल बाजूला ठेवून मनोजला भेटायचं हे मी ठरवलं होतं. माझे बाबा साताराला गावाला असताना मराठा क्रांती मोर्चात सहभागी होत असतात, अशी एक आठवणही एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना सांगितली.

Exit mobile version