महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर भेट घेतली. आता राज्यपाल अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतील असे या नेत्यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले.
अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सध्या चर्चा सुरू असून आवाजी मतदानाने ही निवड करायची असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. तर हे नियमांना धरून नाही असे विरोधी पक्ष भाजपाचे मत आहे. आता या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यपालांनी मंजुरी मिळविण्यासाठी महाविकास आघाडीच्या छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची राजभवनवर जाऊन भेट घेतली.
त्यानंतर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिलेला आहे. त्यात त्यांच्याकडून मंजुरी हवी आहे. त्यासंदर्भात विनंती करण्यासाठी आम्ही गेलो होतो. उद्या याबाबतचा निर्णय त्यांनी जाहीर करावा, अशी विनंती केली आहे.
थोरात म्हणाले की, नियम बदलाबाबत फार विचारणा केली नाही. लोकसभेत जी पद्धत आहे तीच विधानसभेकरता पद्धत केली आहे. आता त्यांना यासंदर्भात अभ्यास करायचा आहे. ती माहिती घेऊन ते बोलणार आहेत.
हे ही वाचा:
‘खुर्चीत असतो तर एसटी आंदोलन इतके दिवस चालले नसते’
२ किलो आरडीएक्सने घडविला होता लुधियाना न्यायालयात स्फोट
‘मन की बात’मधून पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटचा गौरव
दिवंगत ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या पत्राबद्दल काय म्हणाले मोदी?
१२ आमदारांना अधिवेशनात सहभागी होऊ द्यावे, अशी चर्चा झाली आहे का यावर तशी चर्चा झालेली नाही, असे थोरात म्हणाले.राज्यपालांपाशी मोठा अनुभव आहे. ते योग्य निर्णय घेतील. काही लोकांचा सल्ला ते घेतील. सकाळपर्यंत त्यांचा निर्णय येईल अशी खात्री आहे, असेही थोरात म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारला राज्यपालांनी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासंदर्भात जे पत्र दिलं होतं, त्याप्रमाणेच आम्ही त्यांना पत्र दिलं आहे. ही निवडणूक दोन दिवसांत होईल. नियमानुसार आम्ही मागणी केली आहे. राज्यपालांची भूमिका सकारात्मक आहे. मी कायदेशीर चर्चा करून उद्या निर्णय कळवतो, असे ते म्हणाले आहेत.