राज्यातील ठाकरे सरकारने विरोधाच्या अनेक भिंती उभारूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपला महाराष्ट्राचा पूर्वनियोजित दौरा सुरुच ठेवला आहे. राज्यातील महाविकास आघाडीने राज्यपालांच्या या दौऱ्यावर टीका केली होती, पण त्याची तमाही न बाळगता राज्यपालांनी मराठवाड्याचा दौरा हा तीन दिवसांचा सुरू केला आहे. राज्यपाल या दौऱ्यात सरकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही घेणार आहेत.
हा दौरा पालकमंत्र्यांनी बहिष्कृत केलेला आहे. राज्यपाल किंवा मुख्यमंत्री यांच्या भेटीदरम्यान संबंधित जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी उपस्थित राहणे हे अनिवार्य आहे. असे असले तरी राज्यपालांचा दौरा मात्र महाविकास आघाडीतील पालकमंत्र्यानी दुर्लक्षित केलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख एका ठिकाणी गेले असता, वर्धा जिल्ह्यातील पालकमंत्री उपस्थित राहिले नाहीत म्हणून त्यांनी तात्काळ हकालपट्टी केली होती.
महाविकास आघाडी सरकारने आपल्या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठविल्यापासून राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. राज्यपालांनी अद्याप ही यादी मंजूर केलेली नाही तर त्याचा राग मनात ठेवून ठाकरे सरकारही राज्यपालांवर कुरघोडी करण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. मध्यंतरी राज्यपालांच्या एका दौऱ्यासाठी विमानही त्यांना उपलब्ध झाले नाही. त्यामुळे विमानतळावरून त्यांना माघारी परतावे लागले होते. हा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे.
हे ही वाचा:
हे सरकार नेमके कोणाचे?
मुंबईचे ते तिघे गेले गंगेत वाहून
आमच्या रवीमुळे गावात ‘प्रकाश’ येईल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासाआघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली होती. ‘राज्यपालांनी आपण मुख्यमंत्री नाही आहोत, हे एकदा समजून घ्यावे. राज्यात एकाच वेळी दोन दोन सत्ताकेंद्र राबवू नयेत,’ असे महाविकास आघाडी सरकारने म्हटले होते. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानी हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांचा दौरा करत आहेत.