राज्यातील अनेक समस्यांवरून विरोधी पक्ष नेते हे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरत असतात. वीज कनेक्शन तोडण्यावरून भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. वीज कनेक्शन तोडणे हा निजामशाही कारभार असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांवर आलेल्या संकट समयी सरकारने कुठलीही मदत केली नाही, उलट अनेक ठिकाणी पंचनामे करायलाही सरकारी यंत्रणा तयार नव्हत्या. अव्वाच्या सव्वा वीजबील सक्तीने वसूल करणे, ऐन कापणीच्या- मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते आणि नेमके त्याचवेळेस वीज कनेक्शन तोडणे, असा निजामशाही कारभार या सरकारने चालवला आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
हे ही वाचा:
भारत अरब देशांना अन्न पुरवठा करणार
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले
प्राजक्त तनपुरे किरीट सोमय्यांच्या रडारवर
…म्हणून पंतप्रधान मोदींनी थोपटली योगींची पाठ
त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘वर्षा’च्या बाहेर पडायला तयार नाहीत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच महाभकास आघाडीने घेतला आहे, असा घाणाघात पडळकरांनी केला आहे.
वीज बिलांमध्ये अनेक त्रुटी आणि अनियमितता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंप नसणाऱ्यांनाही अव्वाच्या सव्वा वीजबील देण्यात आली आहेत. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. कापणी हंगामात वीज कनेक्शन तोडणीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे शेतकऱ्यांनी स्वत: करून आपापल्या कार्यक्षेत्रातील तहसीलदाराकडे ते सुपूर्द करून पोचपावती घ्यावी, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.