एसटी महामंडळाला ज्याची गरज नाही, अशा गोष्टींच्या हजारो कोटींच्या टेंडरना मंजुरी द्यायची आणि नंतर ती देणी फेडायची पण महामंडळातील कर्मचाऱ्यांना मात्र वेतनापासून दूर ठेवायचे. हे नेमके कुणाच्या टक्केवारीसाठी चालले आहे, असा सवाल उपस्थित करत एसटी महामंडळातील सचिन वाझे कोण, असा सवाल भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.
एका व्हीडिओद्वारे यांनी एसटीच्या भोंगळ कारभारावर टीका केली. सध्या एसटीचे कर्मचारी हे प्रचंड आर्थिक संकटात आहेत. वेतन वेळच्यावेळी मिळत नाही, एसटीची दुरवस्था झालेली आहे, बसगाड्या नादुरुस्त आहेत, पण नवनवी टेंडर काढून अवास्तव खर्च केला जात आहे. वेतनाअभावी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याही झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.
पडळकर म्हणतात की, सर्वसामान्य माणूस मोठ्या विश्वासाने एसटी प्रवास करतो. पण याच एसटीतील मराठी कर्मचाऱ्यावर आत्महत्येची वेळ यावी ही गोष्ट अपमानजनक आणि चीड आणणारी आहे. एकतर आधीच तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवर होत नाही. ठाकरे सरकार आल्यापासून वेतन करार झालेला नाही. महामंडळाला आवश्यक नसणाऱ्या गोष्टींची हजारो कोटीची टेंडर काढायची आणि त्यांची देणी द्यायची पण कर्मचाऱ्यांचे पगार मात्र द्यायचे नाहीत. हे नेमके कुणाच्या टक्केवारीसाठी चालले आहे. महामंडळातील सचिन वाझे नेमका कोण आहे? याचा तपास करण्याची गरज आहे.
#एसटी_महामंडळाला मोठं करणाऱ्या #मराठी कर्मचाऱ्यांवरच पगाराविना आत्महत्येची वेळ येते,पण कंत्राटदारांचे घरं भरण्याच काम सुरूये.महामंडळातला #सचिन_वाजे कोण?माझा सरकारला इशारा आहे की‘जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्या’अन्यथा संघर्ष अटळ आहे.@BJP4Maharashtra @CMOMaharashtra pic.twitter.com/ENiKj97q8F
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 19, 2021
२१ सप्टेंबरला सांगलीत बैठक
पडळकर म्हणतात की, या सगळ्या प्रश्नांसाठी युनियनने आवाज उठविला पाहिजे, पण युनियन प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहे. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो. मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आपलं राज्य सरकारकडे एवढं मागणं आहे की, राज्य कर्मचाऱ्यांना जे देता तेच एसटी कर्मचाऱ्यांना द्या, अन्यथा संघर्ष अटळ आहे.
हे ही वाचा:
आज उघडणार मराठी बिग बॉसच्या घराचे दार
पेन्शन योजनेतील ग्राहकांच्या संख्येत होतेय वाढ
अफगाणिस्तानमध्ये तालिबानांनी बंद केले महिलांना मंत्रालयाचे दरवाजे
माझी एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, २१ सप्टेंबरला झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे आपण या सगळ्या मुद्द्यांवर विचार करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले आहे. तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या बैठकीला उपस्थित राहावे, अशी विनंती आहे.