‘आर्यन खानसाठी बैठका; पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही’

‘आर्यन खानसाठी बैठका; पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही’

कोरोनाच्या पूर्वीपासूनच परिवहन मंडळाची आर्थिक स्थिती डगमगलेली असताना गेल्या काही महिन्यांपासून एसटीचे आर्थिक गणित पूर्णपणे फिसकटलेले आहे. मागील काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी संप केला होता. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अमान्य केल्याने आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका सुरु आहे. यावरूनच भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनीही राज्यसरकारला धारेवर धरले आहे.

काल एका बीडमधील एसटी कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. आतापर्यंत ३१ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. सरकारकडून कोर्टाची दिशाभूल सुरू आहे. जर यांनी वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती, तर ३१ जणांचे प्राण वाचले असते. महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती, असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.

हे ही वाचा:

नवाबी दिनचर्या

रुग्णालयांमधील आगींच्या घटनेत दीड वर्षात गेले ५१ बळी

एनसीबीने गोठवली १२ कोटींची मालमत्ता

सव्वा लाख कोटींची ‘दिवाळी’

जराही नैतिकता शिल्लक असेल तर ३१ जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून अनिल परब तुम्ही राजीनामा देणार आहात का? तुम्ही कसेही वागा, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही ते म्हणाले. आर्यन खानची सुटका व्हावी म्हणून मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक आणि गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात, पण एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायला वेळ नाही. आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून स्वतः नामानिराळं राहायचं हा त्यांचा डाव आहे. पण त्या ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचा तळतळाट तुम्हाला सुखाने जगू देणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना १० नोव्हेंबरपासून मंत्रालयाच्या दारात संसार थाटत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version