‘शरद पवार मानाची अपेक्षा ठेवतात, तर दुसरीकडे बगल में छुरी घेऊन फिरतात’

‘शरद पवार मानाची अपेक्षा ठेवतात, तर दुसरीकडे बगल में छुरी घेऊन फिरतात’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या भाषणातून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. रविवारच्या पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रण न मिळाल्यामुळे शरद पवार हे हताशपणे बोलत असल्याचा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

“एकीकडे शरद पवार हे आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात आणि दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले. शरद पवार यांचे भाषण ऐकून आपण हताश झालो असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. “शरद पवार यांना मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे पवार साहेब हताशपणे बोलले असतील,” असा टोलाही त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

“आमच्या देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा राग यामुळेच आहे की, माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्र फडणवीसांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळेच प्रस्थापितांचा तीळपापड होतोय. म्हणूनच आमचे हितचिंतक असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत खुपतात,” अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

“मी पवार साहेबांना सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ असे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्या करताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात पावसात भिजून सुद्धा फक्त ५४ च आमदार निवडून आले. त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडून दिले अशा खोट्या थापा मारू नका,” असा खोचक टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

‘कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारलाय काय?’

युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला

… म्हणून भारतीय महिलांचं होतंय कौतुक!

‘नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात?’

गोपीचंद पडळकर म्हणाले की, “आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही. पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीस वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही.  सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असत,” असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

Exit mobile version