आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ संपायचे नाव घेत नसताना भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील, असे मोठे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पडळकर यांनी हे वक्तव्य केले. आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून राज्यात झालेल्या गोंधळावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोडच्या तुरुंगात असतील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
हे ही वाचा:
विद्यार्थी पोहोचले पण परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, प्रश्नपत्रिकाच नाहीत!
बनावट वेबसाईटच्या आधारे तुळजाभवानी भक्तांची लूट!
इटलीच्या दौऱ्यात पुन्हा मोदी-बायडेन भेट
ICC Men’s T20 WC: आज कोणाला ‘मौका’?
काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. परीक्षा घेण्याचे कंत्राट असणाऱ्या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची वेळ विभागावर आली होती. त्यानंतरही विद्यार्थ्यांना चुकीचे परीक्षा केंद्र मिळाल्याचे, वेगळ्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र मिळाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तसेच एका दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यात दोन पेपर ठेवण्यात आल्याचेही समोर आले होते.
आज आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक आणि प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नसल्याचे समोर आले आहे. विभागाच्या या भोंगळ कारभारावर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.