ठाकरे सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत राज्य लोकसेवा आोयगाच्या (एमपीएससी) परिक्षा पुढे ढकलल्या आहेत. यावरून भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुणे येथे ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आमदार पडळकरही सामील झाले. “हे आंदोलन चिघळले तर याला सरकार जबाबदार असेल.” असा इशाराही आमदार पडळकर यांनी दिला आहे.
गुरुवारी महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने राज्य सेवा आयोगाने निर्णय घेत एमपीएससीच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या. यावरून राज्यातले विद्यार्थी आक्रमक झाले. गोपीचंद पडळकर हे तर सरकारवर चांगलेच बरसले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार विरोधात राज्यातले विद्यार्थी रस्त्यावर
पश्चिम बंगाल पोलिसांची ममताच्या विरोधात ‘साक्ष’
बंगालचा प्रवास: लाल सलाम ते जय श्रीराम
“गेले दहा दिवस राज्याचे अधिवेशन झाले. यांना परीक्षा पुढेच ढकलायच्या होत्या तर अधिवेशनात यावर चर्चा का केली नाही? जर सरकारने परिक्षा घेतली नाही आणि हे आंदोलन चिघळले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.” असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.
“सरकारने चोवीस तासांच्या आत सरकारने दुसऱ्यांदा विश्वासघात केला आहे. आधी वीज तोडणी होणार नाही असे अधिवेशनाच्या सुरवातीला सांगत त्यावर स्थगिती दिली. त्यांनतर शेवटच्या दिवशी वीज तोडणी होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकार पुन्हा तसेच वागत आहे.” असे पडळकर म्हणाले.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर?
“विद्यार्थी हे आतंकवादी नाहीत. ते कोणत्याही पोलिसांना काही बोलले नाहीत. मग एवढे हजारो पोलीस इथे का पाठवले? विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला?” असा सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारला केला आहे.
दरम्यान पुण्यासोबतच औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूर अशा महाराष्ट्राच्या विविध शहरातले विद्यार्थी ‘एमपीएससीची परीक्षा झालीच पाहिजे’ या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.