‘युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज’

‘युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज’

कोरोना महामारीच्या पूर्वीपासूनच आर्थिकदृष्ट्या डगमगलेल्या परिवहन मंडळाची आताची आर्थिक स्थिती अजूनच बिकट झाली आहे. मागील दोन दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन केले. दरम्यान परिस्थितीपुढे हतबल होऊन अहमदनगर येथील एका कर्मचाऱ्याने एसटीच्या मागच्या बाजून गळफास लावून आत्महत्या केली. नाशिकमधील एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने शिक्षणासाठी पैसे नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

पडळकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एक कार्टून शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘स्वत:चा पोरगा बसवलाय मंत्रीमंडळाच्या मखरात आणि एसटी कामगारांची मुलं मात्र धाडलेत मृत्यूच्या दारात’ अशा शब्दात पडळकरांनी त्यांच्यावर टीका केली आहे. कार्टूनला ‘युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज’ असे शीर्षक दिले आहे.

दरम्यान, अहमदनगर येथील एसटी चालकाने नुकतीच आगारात उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर काल (३० ऑक्टोबर) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने शिक्षण घेण्यास वडिलांचे वेतन पुरेसे नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. या तरुणाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे.

Exit mobile version