गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर खरपूस टीका
‘शरद पवार यांना अचानक ओबीसींबद्दल प्रेम उफाळून आले आहे. असं म्हणतात की, ते कोणतंही काम हेतूशिवाय करत नाहीत आणि खरा हेतू कधीही दाखवत नाही. मला त्यांना इतकंच सांगायचे आहे की, केंद्राने ताट वाढले आहे, हे खरे आहे आणि तुमचे हात बांधले आहेत हेही खरे आहे. पण हे हात बांधले गेले कुणामुळे ते सांगा, असा खणखणीत सवाल भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे.
सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावरून केंद्रावर टीका केली. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा संपवा, इम्पिरिकल डाटा द्या, जातनिहाय जनगणना करा अशा मागण्या पवारांनी केल्या. त्याचा पडळकर यांनी खरपूस समाचार घेतला.
ज्यांनी उभ्या आयुष्यात फक्त पुतण्या-मुलगी-नातवालाच मोठं केलंय त्या #शरद_पवारांचं आज अचानक #ओबीसीप्रेम कसं उफाळून आलंय? यामागं काय हेतु आहे?#OBC @BJP4Maharashtra pic.twitter.com/CcnRPNnv8d
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 16, 2021
पडळकर म्हणाले की, पवारांचे हात बांधले गेले ते केंद्रामुळे की आपल्या पै पाहुण्यांमुळे. उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, नातू, मुलगी यांना मोठे करण्यासाठी काम केले. जेव्हा जेव्हा सत्तेचा भाग बनलात तेव्हा तुम्ही तुमच्या करामतींनं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण घालवलं, जो २०११ चा जनगणना अहवाल आज तुम्ही मागत आहात, त्यातला घोळ तुम्ही सत्तेत असलेल्या मनमोहन सिंग सरकारनेच घातला आहे.
हे ही वाचा:
पालिकेचा भंगारात नवा कोरा घोटाळा?
भारतीय गोलंदाज लॉर्ड्स ऑफ क्रिकेट; भारताने इंग्लंडला नमविले
शेवटी अनधिकृत बांधकामांवर म्हाडाचा हातोडा
खिळखिळ्या इमारतींबरोबर सेवाशुल्कामुळे म्हाडाचे रहिवाशीही जर्जर
भागीदारी तुमची, पाप तुमचं, बोंब मोदी सरकारच्या नावाने ठोकायच्या. मला जातीयवादी विष पेरणाऱ्यांना विचारायचे आहे की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी तुम्हाला जातनिहाय डाटा हवाय कशाला, तुम्हाला इम्पिरिकल डाटा हवा आहे, शिवाय, मराठा आरक्षणाबाबत ते मागासलेले आहेत हे सिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही. भूलथापा मारायच्या लोकांचे लक्ष विचलित करायची, ही करामत बहुजन मुलांना कळलेली आहे. जे मराठा आरक्षणाबाबत बोलताना पळ काढतात. ते शरदचंद्र पवार आज भूमिका मांडत आहेत. त्यांना भूमिका मांडावी लागली हेच बहुजनांच्या प्रस्थापितांविरुद्धच्या लढाईचे यश आहे, असेही पडळकर म्हणाले.