‘काकांचं दुःख सतावत असल्यामुळेच बंदचा कांगावा’

‘काकांचं दुःख सतावत असल्यामुळेच बंदचा कांगावा’

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी केलेल्या महाराष्ट्र बंद संदर्भात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी या महाराष्ट्र बंदवर टीका केली आहे. ‘काकांचं दु:ख तुम्हाला सतावत असल्यानेच महाराष्ट्र बंदचा हा देखावा करण्यात आला आहे,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

‘लखीमपूरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती, सहवेदना आहेत. त्यामुळेच या प्रकरणाचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. आमचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ क्षमतापूर्ण आहेत, या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील. पण जनाब संजय राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. इकडचा शेतकरी ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्याचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरतीही पोहचले नाहीत. अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेलं आहे,’ अशी टीका पडळकर यांनी केली आहे. ‘तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे,’ अशी खोचक टीकाही पडळकरांनी केली आहे.

‘मुळात तुम्हाला काकांचे दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची कीड साफ करायला घेतली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे, कारखाने कवडीमोल भावाने गिळणाऱ्यांवरती फास आवळत आहेत. त्याचेच पित्त खवळल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा करण्यात आला आहे,’ अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरीच्या निषेधार्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. महाराष्ट्रामधून या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत असून काही ठिकाणी शिवसेनेची आक्रमक भूमिका दिसून येत आहे.

Exit mobile version