पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’

पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे. ‘सगळं गावच करील तर सरकार काय करील?’ ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला असताना, त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचतेय असा सवाल पडळकरांनी केला आहे. यावेळी पडळकरांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना थेट टार्गेट केलं.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोव्हिड आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय”.

‘सगळं गावच करील तर सरकार काय करील?‘ हाच प्रश्न मला या कामचुकार मंत्र्यांबद्दल पडला आहे. नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशाने ही करोनामुक्तीची स्पर्धा आणली आहे, असं पडळकर म्हणाले.

या योजनेच्या व्यवस्थापणेचे सर्व २२ निकषांमध्ये या वसुली सरकारला शून्य गुण आहेत. या बाप्याने हे २२ निकष ठरवताना कुठेही या पथकांना किंवा व्यवस्थापणेसाठी ‘निधी’ कोण देणार? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे, असं म्हणत पडळकरांनी हसन मुश्रीफांवर निशाणा साधला.

खरंतर या ५० लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे. कारण ज्या पत्रकारांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रुपयाचीही मदत तर केलीच नाही, पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाही. ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्या’ भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे, असा हल्लाबोल पडळकरांनी केला.

हे ही वाचा:

‘तुझ्या बापाला’ वर महापौर म्हणतात, मी लिहिलंच नाही

…तर अमेरिकेशीही संघर्ष करू

कोरोना रुग्णांमध्ये किंचित वाढ, तर मृतांच्या संख्येत घट

दिल्लीच्या मशिदीत अल्पवयीन मुलीचा बलात्कार, मौलवीला अटक

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित केली आहे. ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यानुसार चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे.

Exit mobile version