नाझीशी संबंधित असलेल्या युक्रेनच्या सैनिकाचा गौरव केल्यामुळे कॅनडाच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे अध्यक्ष अँथनी रोटा यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
अँथनी रोटा यांनी गेल्याच आठवड्यात सार्वजनिकरीत्या ९८ वर्षीय माजी सैनिकाचा गौरव केला होता. या सैनिकाने दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी सैनिकांसोबत काम केले होते. य सैनिकाचे नाव यारोस्लॅव्ह हुंका असे आहे. त्यांना कॅनडाच्या संसदेने आमंत्रण दिले होते. तेव्हा रोटा यांनी या सैनिकाचा गौरव ‘युद्धवीर’ अशा शब्दांत केला होता. त्यांच्या या कृतीवरून वादाचे मोहोळ उठल्यानंतर त्यांनी आता राजीनामा दिला आहे.
‘हाऊस ऑफ कॉमन्स कोणाही नागरिकापेक्षा उच्च आहे. त्यामुळे मी त्याचा अध्यक्ष या नात्याने या पदावरून पायउतार होतो आहे,’ असे रोटा यांनी नमूद केले आहे. ‘माझ्या या वक्तव्यामुळे काही व्यक्ती आणि समुदायाचे मन दुखावले गेले. विशेषत: ज्यू नागरिक आणि नाझीच्या अत्याचारापासून वाचलेल्या नागरिकांना दु:ख झाले,’ अशी प्रतिक्रिया रोटा यांनी दिली.
हुंका यांना कॅनडाच्या संसदेत आमंत्रित करण्यात आल्यानंतर त्यांना संसदेतील खासदारांनी उभे राहून मानवंदना दिली होती. ‘सार्वजनिकरीत्या अशाप्रकारे नाझी सैनिकाचा गौरव केल्यामुळे कॅनडा आणि जगभरातील ज्यू समाज तसेच, अनेक व्यक्तींना अतीव दु:ख झाले. मी या कृतीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो,’ असे रोटा यांनी नमूद केले आहे. बुधवारपासून लोकसभेचे उपाध्यक्ष त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.
हे ही वाचा:
इराकमध्ये लग्नसोहळ्यात लागलेल्या आगीत १०० ठार
गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का
… आणि पंतप्रधान मोदींनी थेट मनमोहन सिंग यांना केला फोन
विद्यार्थ्यांच्या राजकारणाचे पर्यवसान आंतरराष्ट्रीय गँगस ऑफ पंजाबमध्ये
युक्रेनचे अध्यक्ष व्होल्डिमिर झेलेन्स्की यांनी कॅनडाला भेट दिली होती. तेव्हा कॅनडाच्या संसदेने युक्रेनियन-कॅनॅडियन माजी सैनिक हुंका यांना आमंत्रित केले होते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही हुंका यांची भेट घेतली होती. ही कृती म्हणजे ट्रुडो यांच्या साम्यवादी सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. मात्र रोटा यांनी जे काही घडले, त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.