मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री ८:३० वाजता त्यांच्या शैलीप्रमाणे फेसबुक लाईव्हद्वारे राज्याला संबोधित केले. यावेळी महाराष्ट्रातील वाढत्या कोविड-१९ केसेस लक्षात घेता, ते लॉकडाऊनची घोषणा करतील अशी शक्यता अनेकांना वाटत होती. परंतु या भाषणातून त्यांनी केवळ आजचं मरण उद्यावर ढकलल्याचं पाहायला मिळत आहे. एक-दोन दिवसात तज्ज्ञांशी बोलून काय तो निर्णय घेईन असं त्यांनी या भाषणात सांगितलं. यावेळी त्यांनी तज्ज्ञांकडून आणि लॉकडाऊनचा विरोध करणाऱ्या विरोधकांकडून उपायही मागितले. राज्यात हॉस्पिटल आणि बेडची संख्या वाढली असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचबरोबर ‘फर्निचर’ जरी बनवलं, तरी डॉक्टर्स कुठून आणायचे? नर्सेस कुठून आणायच्या? आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे असा सवालही त्यांनी केला.
हे सगळं बोलत असताना मात्र देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना का नाही आणि महाराष्ट्रातच का वाढतोय? या प्रश्नांवर त्यांनी उत्तर देणं टाळलं. देशातील दहा सर्वाधिक कोरोना केसेस असलेल्या जिल्ह्यातील आठ जिल्हे महाराष्ट्रातले का? यावरही ते बोलले नाहीत. त्याचवेळी अमेरिका, ब्राझील, पोर्तुगाल, डेन्मार्कसह जगभरातील अनेक देशांचे दाखले द्यायला मात्र मुख्यमंत्री विसरले नाहीत.
आपल्या या भाषणात मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी राजकारण करत नसल्याचे म्हटले असले तरीही विरोधकांवर त्यांनी टीका केलीच. होळी नंतर महाराष्ट्रात शिमगा सुरू झाला असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यासोबतच जे म्हणत आहेत की लाॅकडाऊन लावला तर रस्त्यावर उतरेन, त्यांनी सरकार विरोधात नाही तर कोरोना विरोधात रस्त्यावर उतरा. कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करा. असे मुख्यमंत्री म्हणाले. पण राजकीय गर्दी जमावणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांवर आणि मित्रपक्षांवर मात्र त्यांनी सोयीस्कर मौन पाळले.
काही दिवसांपूर्वी जेष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लाॅकडाऊनच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावले होते. मुख्यमंत्र्यांना हे फारच जिव्हारी लागलेले दिसले. कारण आपल्या भाषणातून त्यांनी महिंद्रा यांना अप्रत्यक्ष उत्तर देण्याचा प्रयत्न केला. उद्योगपतींना मी सांगू इच्छितो की फक्त ‘फर्निचर’ वाढवून काय होणारे? असा सवाल त्यांनी केला. आरोग्य व्यवस्था वाढवा म्हणताय तर वाढवतो पण त्यासाठी लागणारे डाॅक्टर, नर्स, कर्मचारी मिळतील याची सोय तुम्ही करा. असं मुख्यमंत्री म्हणाले.
हे ही वाचा:
माझ्या पतीच्या मृत्यूस सरकारी अधिकारीच जबाबदार
भारताने केला म्यानमारमधील हिंसाचाराचा निषेध
एलडीएफने भगवान अय्यपांच्या भक्तांचं स्वागत पायघड्यांऐवजी लाठीने केले
घरात दोन कोविड रुग्ण असताना मुख्यमंत्री बाहेर कसे पडले?
लसीकरणच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाला आहे. आपण लसीकरण अधीक वाढवू शकतो. तेवढी आपली क्षमता आहे. पण केंद्राने आपल्याला अधिक लस पुरवली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. पण या आधी केंद्राकडून पाठवलेला लसींचा साठा गोदामात पडून असतो आणि महाराष्ट्र सरकार ते वापरत नाही, या विरोधकांच्या आरोपांबद्दलही मुख्यमंत्र्यांनी काहीच उत्तर दिले नाही.