कापसाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत खडसे- महाजन यांच्यात जुंपली

कापसाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत खडसे- महाजन यांच्यात जुंपली

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे यांच्यात गुरुवारी विधानपरिषदेत चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कापसाला हमीभाव देण्यासंदर्भात मांडलेल्या २८९ च्या प्रस्तावादरम्यान खडसे यांनी जळगावसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

यावेळी खडसे यांनी सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६ हजार रुपये अनुदान देण्यासोबतच अधिवेशन संपण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत काय तो निर्णय जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी सध्याचे सरकारमधील मंत्री गिरीश महाजन हे विरोधी पक्षात असताना कशाप्रकारे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होते याची आठवण करून दिली.

गिरीश महाजन यांनी दहा वर्षांपूर्वी कापसाला ६ हजार रुपये भाव मिळावा म्हणून १२ दिवसांचे आमरण उपोषण केले होते. त्यावेळी ते गोपीनाथ मुंडेना आणा, काय करायचे ते करा पण माझे उपोषण सोडवा म्हणून माझ्याकडे गयावया करत होते असे खडसे यांनी सभागृहात सांगितले. तसेच गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या खरंच जवळचे आहेत का? याबाबत मला खात्री नाही, कारण ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असते तर ते कधीच जळगावचे पालकमंत्री झाले असते, असा चिमटा खडसे यांनी महाजनांना काढला.

यावर प्रत्युत्तर देताना मंत्री महाजन म्हणाले, मी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी १२ दिवसांचे उपोषण केले होते हे खरं आहे. परंतु त्यावेळी काहीजण माझे हे उपोषण सुटू नये म्हणून प्रयत्न करत होते. आता काही जण माझ्या पालकमंत्री पदाची काळजी करत आहेत. एकनाथ खडसे यांनी माझ्या पदाची काळजी करू नये. तुम्ही तिकडे कोणत्या अवस्थेत आहात. तुम्ही मागील दाराने इथे आला आहात. तुमच्याकडे मतदारसंघही राहिला नाही, स्वतःची ग्रामपंचायत, नगरपालिकाही राहिली नाही असे प्रत्युत्तर महाजन यांनी खडसे यांना दिले. यावर खडसे आणि महाजन यांच्यात चांगलीच जुंपली. अखेर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या वादात हस्तक्षेप करत हे अधिवेशन संपायच्या आत कापसाच्या प्रश्नांवर सभागृहात निवेदन करायची सूचना केली.

हे ही वाचा:

माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही…अजित पवारांचा टोला

सर्वोच्च न्यायालयाकडून कलम ३७० बाबत कपिल सिब्बल यांची तासमपट्टी

अंदमान बेटांवर बसले भूकंपाचे धक्के

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून ज्ञानव्यापी मशीद सर्वेक्षणाला हिरवा झेंडा

तुझं- माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना

विधानपरिषद सभागृहात जेंव्हा- जेंव्हा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन समोरासमोर येतात, तेव्हा त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक घडत असते. गुरुवारी देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महाजन आणि खडसे यांच्यात वाद झाला. हाच मुद्दा पकडून उपसभापती निलम गोऱ्हे यांनी या दोघांचा वाद म्हणजे तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना असा असल्याची टिप्पणी केली.

Exit mobile version