कुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय?

कुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय?

‘नावडतीचे मीठ अळणी’, अशी एक म्हण आहे मराठीत. अग्रलेख मागे घेणारे देशातील एकमेवाद्वीतीय संपादक गिरीश कुबेर यांच्या मोदीद्वेष्ट्या अग्रलेखांचा घाणा पाहून ही म्हण आठवल्याशिवाय राहात नाही.

‘कोरोना किरकिरवंत’ या मथळ्याखाली आज खरडलेला अग्रलेख त्याच पठडीतला. मोदींनी लागू केलेली टाळेबंदी कशी अन्यायी होती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कशी विचारी टाळेबंदी केली आहे, अशी मांडणी या अग्रलेखातून केलेली दिसते.

वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स आदी विदेशी वर्तमानपत्रांची उचलेगिरी करून अग्रलेख लिहीणाऱ्या कुबेरांना फावला वेळ बराच असल्यामुळे त्यांचा वेब मालिकांचा अभ्यासही दांडगा असावा. त्यामुळे ‘द क्राऊन’ या वेब मालिकेतील राणी दुसरी एलिझाबेथ हीचा संदर्भ या अग्रलेखात दिलेला आहे.

हे ही वाचा:

बंगालमध्ये भाजपाच्या बैठकीत खोडा

अखेर अनिल देशमुखांचा राजीनामा

अक्षय कुमार पाठोपाठ विकी कौशललाही कोरोनाची लागण

‘महाराज्ञीपदासाठी माझ्यापेक्षा पात्र, गुणसंपन्न अनेक व्यक्ती आसपास आहेत, याची जाणीव मला आहे. तरीही सम्राज्ञीपदाचा मुकुट काही योगायोगाने असेल, पण माझ्या शिरावर आहे; तेव्हा तुम्हास आवडो न आवडो, अंतिम निर्णयाधिकार माझाच असेल!’ असे ‘द क्राऊन’मधील संवादाचे दाखले देत कुबेरांनी उद्धव ठाकरे यांची तुलना दुसऱ्या एलिझाबेथशी केली आहे.

‘जागतिक आरोग्य संघटने’ला सल्ला देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा कोणी गुणसंपन्न व्यक्ति त्यांच्या आसपास आहे, यावर आमचा विश्वास नाही. त्यांच्या शिरावर असलेला मुख्यमंत्री पदाचा मुकुटही केवळ त्यांच्या अनेक वर्षांच्या राजकीय तपस्येचे फळ आहे, असे आम्ही मानतो, निर्णय घेण्याच्या त्यांच्या अधिकारावरही आमचा विश्वास आहे. त्यांनी निर्णय घ्यावेत अशी आमचीही इच्छा आहे.

रविवारी सायंकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाची नवी नियमावली जाहीर झाली. ती लॉकडाऊनच्या नियमावली इतकीच कठोर आहे. फक्त ‘पोपट मेला असे न सांगता तो हलत नाही, बोलत नाही, खात-पित नाही’ असे सरकारने सांगितले आहे. लॉकडाऊन हा शब्द वगळता सर्व काही त्यात आहे. कुबेरांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतूक केले आहे.

१ एप्रिल रोजी याच कुबेरांनी ‘घालमोडे दादा’ या मथळ्याखाली अग्रलेख खरडला होता. अग्रलेखात कुबेर म्हणतात, स्वत:स काही आवरेनासे झाले, की सरकारहाती असलेला सोपा मार्ग म्हणजे टाळेबंदी. मात्र, पहिल्या अनियोजित आणि अनियंत्रित टाळेबंदीच्या जखमांवर दुसरी टाळेबंदी हा उतारा असू शकत नाही…

बहुधा त्या दिवशी एप्रिल फूल असल्यामुळे किंवा लिहीलेला अग्रलेख मागे घेण्याची सिद्धी प्राप्त असल्यामुळे चार दिवसांनी कुबेरांनी आपले शब्द गिळले आणि ठाकरे सरकारने मागील दाराने केलेल्या टाळेबंदीचे स्वागत केले. कुबेरांच्या कोलांट्या जाणत्या पवारांनाही तोंडात बोटं घालायला लावतील इतक्या अफलातून आहे.

या दोन अग्रलेखात इतक्या विसंगती आहेत की या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याच्या कुबेरांच्या प्रतिभेचे कौतूक केल्याशिवाय राहवत नाही. सोमवार ५ एप्रिलच्या अग्रलेखात म्हटले आहे की ‘कोरोनाचा विषाणू नेत्यांची छाती आणि कार्यक्षमता पाहून पसरत नाही’ आणि १ एप्रिलला कुबेर म्हणतात ‘आपल्याकडे कोरोना पसरला तो केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळेच…’ रोज गांजा घेणारा नशेडी सुद्धा इतके परस्परविरोधी तर्क करू शकत नाही.

या उलट सुलट तर्कामागे एकच समान धागा आहे तो मोदीविरोधाचा. सत्तेवर आल्यापासून मोदींनी जे अनेक कारनामे केले त्यात छापील विचारवंतांचा बाजार उठवण्याचे काम मोठे आहे. नीरा रादीया प्रकरणात अनेक तथाकथित उदारमतवादी विचारवंत पत्रकार दिल्लीत कशी दलाली करतात हे उघड झाल्यानंतर लोकांचा पत्रकारीतेवरील विश्वास उडाला. तटस्थ पत्रकारीतेची हाळी देऊन वर्षोंवर्षे एका पक्षासाठी लेखणी झिजवणारे आणि खासदारकी पदरात पाडून घेणारे ज्येष्ठ पत्रकार आता महाराष्ट्राला नवे नाहीत. अशा सुपारीबाज पत्रकारांना मोदी २००२ पासून ओळखून आहेत. ते अशा पत्रकारांना कवडीची किंमत देत नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या काळात सरकार दरबारी असलेला त्यांचा दबदबा संपुष्टात आलेला आहे. नोटबंदीमुळे तळघरं उद्ध्वस्त झालेले राजकारणी आणि बाजार उठलेले हे कुबेरांसारखे पत्रकार त्यामुळे संधी मिळेल तेव्हा मोदींवर गरळ ओकत असतात. त्यातून निर्भीड पत्रकारीता सिद्ध करण्याची संधीही साधली जाते.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही कुबेरांच्या टीकेची धार बरसली आहे. शेलक्या शब्दात कुबेरांनी त्यांना लक्ष्य केले आहे. राणेंच्या निर्भीडपणाला अग्रलेख मागे घेणाऱ्या कुबेरांच्या सर्टीफीकेटची गरज आहे? कुबेरांची ही निर्भीड पत्रकारीता भाजपासाठी राखीव आहे. काही दिवसांपूर्वी ‘वाझे तुझे माझे’ या मथळ्याखाली लिहीलेल्या अग्रलेखात त्यांची निर्भीड लेखणी मुख्यमंत्र्यांचे नाव घ्यायलाही धजावली नाही. कुबेरांच्या लेखी काही ‘अदखलपात्र’ नेत्यांचीही ताज्या अग्रलेखात चर्चा करण्यात आली आहे. ज्यांच्यावर टीका करण्यात आली आहे त्यांच्या दृष्टीने लेख उचलणारा आणि अग्रलेख मागे घेणारा संपादक कितपत दखलपात्र आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे.

परंतु या अग्रलेखाच्या उठाठेवीत जो मुद्दा सर्वात दुर्लक्षिला गेला तो नेमका कोणता? भाजपाचे नेते या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांविरुद्ध आणि राज्य सरकारविरुद्ध किरकिर करतायत तो मुद्दा कोणता? ‘राज्यात कोरोनाचे नियम लागू करताना सर्वसामान्य माणूस उपाशी मरणार नाही याची काळजी घ्या’, हा एवढाच मुद्दा भाजपाचे नेते उच्चारवाने मांडत आहेत. एसी केबिनमध्ये बसून अग्रलेख खरडणाऱ्या कुबेरांसारख्या पत्रकाराची लेखणी सर्वसामान्यांच्या पोटाची भूक समजण्या इतकी संवेदनशील नाही. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात त्या गरीबासाठी पाठवलेला तांदूळ विकून खाणाऱ्या ठाकरे सरकारसाठी ही लेखणी नित्यनियमाने झिजत असते.

हे ही वाचा:

अक्षयनंतर राम सेतू चित्रपटातील ४५ जणांना कोरोना

वाझेला पाठिंबा देणारे मुख्यमंत्री गप्प का?

आता गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या तत्त्वाला अनुसरून राजिनामा द्यावा

देशातील छोट्यात छोट्या राज्याने लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांसाठी एखादे तरी पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्र सरकारने मात्र एकही पॅकेज जाहीर न करता भरमसाठ वीज बिले मात्र पाठवली आणि एखाद्या सावकारासारखी त्याची वसूलीही सुरू आहे. राज्यात लॉकडाऊन होईल या भीतीने सर्वसामान्यांची भीतीने गाळण उडाली आहे. पुण्याच्या एका वडापाव विक्रेत्याने आत्महत्येचे सुतोवाच केलेला व्हीडीयो समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. परंतु हा सावळागोंधळ मोदींनी केला नसल्यामुळे त्यावर भाष्य करणे कुबेरांच्या निर्भीड पत्रकारीतेला झेपणारे नाही.

कुबेर पुढे म्हणतात ‘वास्तविक वाढता करोनाप्रसार रोखण्याचा परिणामकारक मार्ग म्हणजे सार्वत्रिक लसीकरण. त्याविषयी काहीच बोलायचे नाही आणि करायचेही नाही, आणि वर राज्यांना फुकाचे सल्ले वा इशारे मात्र द्यायचे. याने काय होणार?’
हे कुबेर भाष्य नेमके कोणासाठी आहे? राज्याला लस पुरवणे हे मोदींचे काम होते, त्यांनी ते केले. आता घराघरात जाऊन त्यांनी लस टोचावी अशी कुबेरांची अपेक्षा आहे काय?

कुबेरांना मोदीद्वेषाची काविळ झाली आहे असे आम्ही म्हणणार नाही, कारण काविळ कधी तरी बरी होते. कुबेरांचा आजार त्या पलिकडे गेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपल्यानंतर ‘पत्रकारांनी कृपया थांबावे, आपले पाकीट घेऊन जावे’, असे आवाहन महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर यांनी केले होते. या पाकिटात असे काय असते? असा प्रश्न तेव्हापासून महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय. कुबेरांचे अग्रलेख वाचून पुन्हा एकादा आम्हाला तोच प्रश्न पडलेला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version