स्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने गुलाम नबी यांना केले ‘आझाद’

स्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने गुलाम नबी यांना केले ‘आझाद’

सध्या देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी ४ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून गुलाम नबी आझाद आणि मनीष तिवारी या प्रमुख सदस्यांना वगळले आहे. यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत फुटीचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.

काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या या यादीत सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, नवज्योतसिंग सिद्धू, भूपेश बघेल, अशोक गेहलोत आणि विविध राज्यांतील अनेक काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. मात्र, यादीतून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि राज्याचे लोकसभा खासदार मनीष तिवारी यांना वगळण्यात आले आहे.

काँग्रेस G- 23 चे सदस्य गुलाम नबी आझाद आणि मनीष तिवारी यांनी काँग्रेसमधील नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. पक्षाच्या वारंवार अपयशाच्या पार्श्वभूमीवर काही फेरबदल करण्याची मागणी करणारे पत्र सोनिया गांधींना लिहिले होते. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना नुकतेच मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. परंतु आझाद यांनी अनेकवेळा काँग्रेसच्या भूमिकेला विरोध केल्याने काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

‘संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला’

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी

पुणे इमारत स्लॅब दुर्घटना प्रकरणी चार जणांना अटक

सुरक्षा दलाकडून जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

तसेच आनंदपूर साहिब मतदारसंघातून विजयी झालेले हिंदू चेहरा मनीष तिवारी यांनाही वगळण्यात आले आहे. या यादीत आपले नाव असले असते तर आश्चर्य वाटले असते. नाव नसल्याचे आश्चर्य नाही, असा खोचक टोला मनीष तिवारी यांनी काँग्रेसला लगावला आहे. राज्यात सुमारे ४० टक्के हिंदू असताना याआधीही पक्षाचा आणखी एक हिंदू चेहरा सुनील जाखड यांनाही ४२ आमदारांचा पाठिंबा असतानाही मुख्यमंत्रीपदावरून बाजूला करण्यात आले होते. गतवर्षी सप्टेंबरमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पद सोडल्यानंतर त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला नसल्याची तक्रार तक्रार जाखड यांनी केली होती. २०२२ च्या पंजाब विधानसभेच्या निवडणुका २० फेब्रुवारी रोजी होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

Exit mobile version