भारतीय जनता पार्टीच्या पाठपुराव्याला यश
घाटकोपर मानखुर्द लिंक रोड वरील नवीन पुलाला छत्रपती शिवरायांचे नाव दिले जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ या नावावर मुंबई महापालिकेने शिक्कामोर्तब केले आहे. पालिकेचा हा निर्णय म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मागणीचे आणि पाठपुराव्याचे यश मानले जात आहे.
घटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी केली होती. ९ डिसेंबर २०२० रोजी त्यासंबंधीचे पत्र खासदार कोटक यांनी मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समितीला (उपनगरे) दिले होते. हा पूल पूर्वीच्या शिवाजीनगर चौकावरून जातो, त्यामुळे या पुलाला देखील छत्रपती शिवरायांचे नाव दिले जावे असे कोटक यांनी या पत्रात म्हटले होते.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स
भारतीय सैन्याला मिळाली नवी ब्रिजिंग सिस्टिम
रावत यांनी मोडला कोश्यारींचा विक्रम
तुम्हाला खुर्ची उबवायला दिली आहे काय?
तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या पुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोईन्नुदीन सुफी चिश्ती-अजमेरी) यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती. १० जून रोजी त्यासंबंधीचे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. या परिसरात अल्पसंख्यांक समाजाचे बहुतांश लोक राहत असून सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव पुलाला देण्याची त्यांची मागणी असल्याचे शेवाळे यांनी म्हटले होते. या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून शिवसेना खासदार शेवाळे यांनी थेट नाही तरी अप्रत्यक्षपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध केला होता.
पण भारतीय जनता पार्टी सतत छत्रपती शिवरायांच्या नावासाठी आग्रही राहिली. त्यांनी महापालिकेत याविषयी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या याच प्रयत्नांना यश आले असून या पुलाला आता छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देणार असल्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. खासदार मनोज कोटक यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे. तर हा जनतेचाच विजय असल्याचे कोटक यांनी म्हटले आहे.
घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील पुलाला 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' हेच नाव देण्यात यावं असा प्रस्ताव आम्ही यापूर्वीच दिला होता. मुंबईकरांच्या भावनांचा आदर राखून महापालिकेने इतर कोणत्याही नावाचा विचार न करता शिवरायांचंच नाव दिल. हा जनतेचाच विजय!
— Manoj Kotak (@manoj_kotak) July 2, 2021