उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेताच माफिया आणि गुंडांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नुकतेच गँगस्टर आणि राजकारणी मुख्तार अन्सारीचा भाऊ, अफजल अन्सारी याला खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. २९ एप्रिलपासून अफजल अन्सारी याची खासदारकी रद्द करण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने अधिसूचनेद्वारे म्हटले आहे. सोमवार, १ मे रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली.
अफजल अन्सारी हा सहा वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिला आहे. दरम्यान, अफजल याला गाझीपूरच्या खासदार- आमदार न्यायालयानं गँगस्टर ऍक्ट प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, फौजदारी खटल्यात, दोन वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेच्या तारखेपासून अपात्र ठरवलं जाईल आणि तुरुंगात राहिल्यानंतर सहा वर्ष अपात्रता चालू राहील.
माफिया मुख्तार अन्सारीलाही गँगस्टर ऍक्ट अंतर्गत १४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात १० वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २२ नोव्हेंबर २००७ रोजी अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांचा गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद कोतवाली येथील गँगस्टर चार्टमध्ये समावेश करण्यात आला होता आणि त्यांच्याविरुद्ध गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सप्टेंबर २०२२ मध्ये दोघांवर आरोप निश्चित करण्यात आले आणि फिर्यादीचे पुरावे पूर्ण झाले. त्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी शनिवारी न्यायालयानं माफिया मुख्तार अन्सारी आणि भाऊ अफजल अन्सारी यांना शिक्षा सुनावली.
हे ही वाचा:
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गाव प्रमुखाला अटक
अभेद्य सिंधुदुर्ग यंदा नौदल दिनाचा सोहळा अनुभवणार!
उद्धव ठाकरे यांनी सोडले जुनेच बाण!
मशीद बंदर परिसरातील मिनारा मशिदीजवळ लागली आग
अफजल अन्सारी गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर विजयी होऊन लोकसभेत पोहचला होता. तर, मुख्तार अन्सारी हा शेजारच्या मऊ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिला होता.