कॉंग्रेसच्या दिल्ली हायकमांडनी महाराष्ट्रातील घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली आहे. परमबीर सिंह ‘लेटरबॉम्ब’ प्रकरणात कॉंग्रेस नाहक बदनाम होत असल्याची पक्षश्रेष्ठींची भावना आहे.
काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी आजच्या आज बैठक घेऊन अहवाल मागवला आहे. मुंबईतील बैठकीच्या अहवालावर स्वतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी निर्णय घेणार आहेत. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणात कॉंग्रेस नाहक बदनाम होत आहे, ही हायकमांडची भूमिका आहे.
परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राष्ट्रवादी आणि सरकारच्या पातळीवर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारची बाजू लावून धरताना दिसत आहेत. परंतु, या सगळ्यात काँग्रेसचे नेते म्हणावे तितके सक्रिय झालेले नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही या सगळ्यावर फारसे बोलताना दिसत नाहीत.
हे ही वाचा:
गृहमंत्र्यांची सीबीआय चौकशी अटळ?
फोन टॅपिंगमुळे उघड झाला पोलिसांच्या बदल्यांचा धंदा
अनिल देशमुखांची लवकरच गृहमंत्री पदावरून हकालपट्टी?
पवार साहेब सांगतील ते ब्रह्मवाक्य
दिल्लीत काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी रविवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन राज्यातील नेत्यांना या संदर्भात निर्देश दिले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी या सगळ्यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. या आमदारांच्या समर्थनाशिवाय ठाकरे सरकार टिकू शकत नाहीत.