काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल, हा निर्णय आता आणखी लांबणीवर पडला आहे. जून महिन्यात नवा अध्यक्ष निवडण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक होणार होती. मात्र, कोरोनामुळे ही निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमधील अंतर्गत खदखद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
अनेक नेते राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्याची मागणी करत आहेत. मात्र, जी-२३ गटाचे नेते या मताशी सहमत नाहीत. योग्य पद्धतीने निवडणुका घेऊन नवा अध्यक्ष निवडावा, असे या गटाचे मत आहे. सोनिया गांधी या राहुल यांना पक्षाध्यक्षपदी बसवण्यासाठी आग्रही असल्या तरी स्वत: राहुल गांधी हे पद स्वीकारण्यासाठी फारसे इच्छूक नसल्याची माहिती मिळत आहे.
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाचा कारभार सांभाळत आहेत. आपल्याला अध्यक्ष म्हणून काम करताना मोकळीक मिळावी, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. पण जी-२३ गटाचे नेते सामूहिक नेतृत्त्वासाठी आग्रही आहेत. गांधी घराण्याचे समर्थक असलेल्या नेत्यांचे म्हणणे न ऐकता काँग्रेस कार्यकारिणीने लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्यावी, असे जी-२३ गटातील नेत्यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा भडकला
तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा
मुस्लिम संघटनांसोबतची आघाडी काँग्रेसला भोवली
कोविड काळात काझीच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंची गर्दी
सोनिया गांधी यांनी सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या निकालासंदर्भात भाष्य केले.या पराभवातून काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे. असे निकाल का आले? हे जाणून घेतलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला एकही जागा मिळाली नाही हे आश्चर्यजनक आहे. या धक्कादायक निकालांची दखल घेतलीच पाहिजे. या निकालांची समीक्षा करण्यासाठी छोटी छोटी टीम तयार करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर पुढील दिशा ठरवता येईल, असं त्या म्हणाल्या.