द्राैपदी मुर्मू यांचे मुंबईत जंगी स्वागत

द्राैपदी मुर्मू यांचे मुंबईत जंगी स्वागत

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईत आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी त्या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर आल्या. या भेटीत त्या शिवसेना, भाजपा खासदार आणि आमदारांची भेट घेणार आहेत.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मुर्मू यांचे मुंबई छत्रपती शिवाजी विमानतळावरून अंधेरी पूर्व येथील ‘द हाॅटेल लिला’ येथे आगमन झाले. भाजपा आणि शिवसेनेने शक्ती प्रदर्शन करत त्यांचे जंगी स्वागत केले. आदिवासी बांधवांनी खास त्यांच्या शैलीतील नृत्य आणि कलागूण सादर करत त्यांचे स्वागत केले. यावेळी द्राैपदी मुर्मू यांना आदिवासी परंपरेनुसार पिवळ्या रंगाचा फेटा परिधान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते, महामार्ग व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पियुष गाेयल, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार रामदास आठवले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व्यासपीठावर उपस्थित हाेते. या सर्व उपस्थितांनी पिवळा फेटा परिधान केला हाेता.

द्राैपदी मुर्मू माताेश्रीवर जाणार का याची उत्सुकता?

एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे. याआधी राष्ट्रपती पदाचे उमेदवार ज्या वेळेस मुंबईत आले होते. त्यावेळेस त्या उमेदवारांकडून ठाकरे कुटुंबियांची भेट मातोश्रीवर जाऊन घेतली होती. त्यामुळे द्राैपदी मुर्मू उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार का? याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा होती.

हे ही वाचा:

राज्यातील नगरपरिषद निवडणूका लांबणीवर

शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

शरद पवारांनीही समर्थन द्यावे: नवनीत राणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. तसंच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन आणि धन्यवाद दिले. राणा पुढे म्हणाल्या की, शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना पाहून, त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक जण काम करतात. पहिल्यांदा आज आदिवासी समाजातून तळागळातून काम करुन एक महिला वर आली आहे. त्या भाजपच्या उमेदवार आहेत किंवा त्यांना मोदीजींनी समर्थन दिलं आहे, हा विचार न करता त्या कोणत्या समाजातून येतात आणि किती धडपड करुन त्या इथे आल्या आहेत. त्या समाजाच्या पाठिशी आपण सगळे आहोत, हा विश्वास देण्यासाठी मी पवार साहेबांना विनंती करते की, त्यांनी आपल्या सगळ्या आमदार आणि खासदारांचं समर्थन द्याव असे राणा यांनी मत व्यक्त केले.

Exit mobile version