भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा हल्लाबोल
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील जनतेला मोफत लस देण्याची ठाकरे सरकारची घोषणा म्हणजे लबाडा घरचे आवताण असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर भातखळकरांनी ठाकरे सरकारला मोफत लसीच्या मुद्यावरून लक्ष्य केले. ठाकरे सरकारने मोफत लसीची घोषणा केली असली तरी खासगी हॉस्पिटलमध्ये ही लस विकतच मिळणार आहे असे ते म्हणाले.
बुधवार २८ एप्रिल रोजी महाराष्ट्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील सर्वांचे लसीकरण मोफत करणार असल्याची केलेली घोषणा केली. पण हे मोफत लसीकरण फक्त शासकीय केंद्रांवर होणार आहे. खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरणाचे पैसे हे द्यावेच लागणार आहेत. यापूर्वीही जेव्हा ६० वर्षांवरील नागरिकांचे आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु होते तेव्हादेखील शासकीय केंद्रावर लसीकरण मोफत होते आणि खासगी केंद्रावर सःशुल्क. म्हणजे ठाकरे सरकारने मोफत लसीकरणाची घोषणा करताना नवे काहीच केले नाही. यावरूनच भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच सतत केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यावरूनही त्यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.
हेही वाचा:
रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत भीषण आग; जीवितहानी नाही
मोफत लशीची फक्त घोषणा, मग १ मेपासून लस का नाही?
लसीकरण केंद्रातील रांगांवर जालीम डोस कोणता?
१५ मे पर्यंत ‘कडक निर्बंध’ कायम
केंद्राकडून लस मिळत नसल्याचे तुणतुणे राज्य सरकारने जारी ठेवले आहे. लस मिळत नसल्याने मोफत लस देता येत नाही असे रडगाणे गाण्यापेक्षा खुल्या बाजारातून ठाकरे सरकार येत्या १५-२० दिवसांत किती लसी विकत घेऊन जनतेला मोफत देणार आहे हे त्यांनी आधी जाहीर करावे असे आव्हान भातखळकर यांनी दिले आहे.
ठाकरे सरकारची मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे लबाड घरचे आवताण आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये लस विकतच मिळणार आहे.
यांचे केंद्र सरकार कडून लस मिळत नसल्याचे रडगाणे सुरूच आहे. खुल्या बाजारातून किती लसी विकत घेणार आणि जनतेला मोफत देणार हे त्यांनी जाहीर करावे अशी माझी मागणी आहे. pic.twitter.com/YltqC65ZUC— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 28, 2021
केंद्र सरकारने लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ५० टक्के लस विकण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे राज्य सरकारला लस विकत घेण्यात काही अडचण येऊ नये. त्यामुळे ठाकरे सरकारची घोषणा ही सवंग लोकप्रियतेसाठी नसून लोकांच्या भल्यासाठी आहे असा संदेशही लोकांपर्यंत जाईल असे भातखळकर यांनी म्हटले आहे.