दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावलं आहे. अरविंद केजरीवाल यांना १८ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश ईडीकडून देण्यात आले आहेत. दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना पाठवलेलं हे चौथे समन्स आहे.
यापूर्वी ईडीने अरविंद केजरीवालांना तीन वेळा समन्स धाडलं आहे. २ नोव्हेंबर, २१ डिसेंबर आणि ३ जानेवारी असे एकूण तीन समन्स ईडीकडून केजरीवालांना बजावण्यात आले होते. पण तिनही वेळी अरविंद केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यावेळी आम आदमी पार्टीने म्हटलं होतं की, “अरविंद केजरीवाल ईडीला चौकशीत सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. मात्र, ईडीनं बजावलेलं समन्स हे राजकारणाशी संबंधित आहे. अरविंद केजरीवालांना अटक करण्याचा ईडीचा डाव आहे.” परंतु, ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर अद्याप आम आदमी पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
हे ही वाचा:
संगीत विश्वातला तारा निखळला; ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन
‘ही तर पवित्र स्वप्नाची परिपूर्ती’
वर्षभरात अयोध्येत ३१ कोटी पर्यटक, प्राणप्रतिष्ठेनंतर महापूर!
‘न्यायालयाचा आदेश सहन करू शकत नाही’… मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठचे पत्र
काही दिवसांपूर्वीपासूनच आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केजरीवालांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यास सुरुवात केली होती. ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या वतीनं दावा केला जात आहे की, अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी हे सुरू आहे. यापूर्वी दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांची जवळपास नऊ तास चौकशी केली होती.