‘नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू’

‘नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू’

काल वरळी येथील बीडीडी चाळीत सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी झाले होते. त्यांना मुंबईमधील नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, केवळ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जखमींपैकी चार वर्षाच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागला. या घटनेवरून मुंबई महानगरपालिकेचे भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रभाकर शिंदे यांनी सांगितले की, घरात सिलेंडरचा स्फोट झाल्यावर रुग्णांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि डॉक्टरांच्या असंवेदनशीलपणामुळे एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर इतर रुग्णांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या असंवेदनशीलतेचा आणि नायर रुग्णालयातील या घटनेचा भाजप निषेध करत असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजपने केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई केली जावी अशी विनंती महापालिका आयुक्तांना केली आहे.

 

काल (३० नोव्हेंबर) वरळी येथील गणपतराव जाधव मार्ग येथील बीडीडी चाळ क्र. ०३ मध्ये राहणारे आनंद पुरी यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये चार जण जखमी झाले. दरम्यान या स्फोटात जखमी झालेल्या चार वर्षाच्या मुलाचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

Exit mobile version