पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीला सुरुवात होत असतानाच, तृणमूल काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तृणमूल काँग्रेसचे चार आणि भाजप आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक कार्यकर्ता ठार झाला. काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)च्या कार्यकर्त्यांवर प्रतिस्पर्धी पक्षांनी हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.
शनिवारी सकाळी सात वाजता पंचायत मतदानाला कडेकोट बंदोबस्तात सुरुवात झाली. हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कापसडांगा भागात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता बाबर अली मारला गेला. तर, याच जिल्ह्यातील रेजीनगर येथे शुक्रवारी झालेल्या क्रूड बॉम्बस्फोटातही तृणमूलचा एक कार्यकर्ता ठार झाला.
जिल्ह्यातील खारग्राममध्ये तृणमूलच्या आणखी एका कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. माधव बिस्वास या भाजपच्या पोलिंग एजंटची शनिवारी कूचबिहार जिल्ह्यातील फालीमारी येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. तर, पूर्व मिदनापूरच्या सोनाचुरा ग्रामपंचायतीचे तृणमूलचे बूथ अध्यक्ष देवकुमार राय यांच्यावर भाजप कार्यकर्ता सुबल मन्ना आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. जलपायगुडीमध्ये, तृणमूलच्या उमेदवारावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. मात्र राज्य हिंसाचाराने ग्रस्त झाले असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात केंद्रीय सैन्य तैनात करण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांवर तृणमूल काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे.
कूचबिहारमधील रामपूरमध्येही गणेश सरकार नावाच्या तृणमूलच्या बूथ कमिटीच्या अध्यक्षाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. तर, दुसर्या घटनेत, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी) कार्यकर्ते हाफिजुर रहमान यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले. कूचबिहार जिल्ह्यातील ओकराबारी गावात ही घटना घडली. रहमान हे काँग्रेस आघाडीचे उमेदवार अन्सार अली यांचे काका होते.
नादिया जिल्ह्यातील गझना ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी तृणमूल कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. नारायणपूर-१ ग्रामपंचायतीमध्ये तृणमूल उमेदवाराच्या पतीवर माकप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. मतदान सुरू होण्यापूर्वी माकप कार्यकर्त्यांनी हसीना सुलताना यांच्या पतीवर गोळीबार केल्याचा आरोप तृणमूलने केला आहे.
हे ही वाचा:
सांताक्रूझच्या बड्या रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरांचा लैगिंग छळ, सहकारी डॉक्टर विरोधात गुन्हा
नीलम गोऱ्हे अंधारेंवर नाराज की उद्धव ठाकरेंवर
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे दोन्ही क्रिकेट संघ खेळणार
राज्यातील त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेतील ७३,८८७ जागांसाठी एकूण २.०६ लाख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ८ जून रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यभरात हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. यात १५हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
२२ जिल्ह्यांमध्ये ६३ हजार २२९ ग्रामपंचायतींच्या जागा आणि नऊ हजार ७३० पंचायत समितीच्या जागा आहेत, तर दार्जिलिंग आणि कालिम्पॉंगमध्ये गोरखालँड प्रादेशिक प्रशासन (GTA) आणि सिलीगुडी उपविभागीय परिषद असलेली द्विस्तरीय यंत्रणा आहे. येथील २० जिल्ह्यांत ९२८ जागा आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ७० हजार जवानांसह केंद्रीय दलाच्या किमान ६०० तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.
सन २०१८मध्ये झालेल्या शेवटच्या पंचायत निवडणुकीत, तृणमूलने सुमारे ३४ टक्के जागा बिनविरोध जिंकल्या होत्या तर, उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीत त्यातील ९० टक्के जागांवर विजय मिळवला होता.