उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या कांदिवली विभागातील सामाजिक कार्यकर्ते राहुल तांगडी यांच्यासह याच विभागातील आणखी काही सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबई भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत तांगडी यांच्यासह चारजणांनी भाजपाचा ध्वज हाती घेतला.
कांदिवलीतील एका कार्यक्रमात हा भाजपा प्रवेश पार पडला. तांगडी यांच्यासह हृदयनारायण सिंह, राधेश्याम यादव, धुरंधर ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी बोलताना आमदार भातखळकर यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत केले आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली काम करणाऱ्या केंद्र सरकारमुळे देशातील गरीब, मजूर, शेतकरी यांना फायदा होत आहे, असे आमदार भातखळकर यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
‘त्या १९ बंगल्यांचा कर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर भरतायत’
अजित डोभाल यांच्या घरात शिरली एक अज्ञात व्यक्ती
भारत की वेस्ट इंडिज? कोण ठरणार टी-२० चा दादा?
‘२५ हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणताय, मग तुम्ही काय दोन वर्ष झोपला होता का?’
यावेळी माजी आमदार रमेशसिंह ठाकूर, उद्योगपती व कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर हेदेखील उपस्थित होते. तांगडी यांनी सांगितले की, आपण या विभागात अनेक वर्षे सामाजिक कार्य करत आहोत, पण आता भाजपात प्रवेश करून सामाजिक कार्याला हातभार लावणार आहोत. कोरोनाच्या संकटकाळात आपण लोकांना अन्नधान्य व इतर मदत पुरविण्याचे काम केले. त्याची माध्यमांनीही दखल घेतली. २००७ पासून आपण समाजकार्यात आहोत. विशेष मुलांसाठीही आपण काम करत आहोत. ज्या मुलींना शाळेत जाण्यासाठी कोणतेही साधन नाही, त्यांनी ५१ सायकली वितरित केल्या. आता अतुल भातखळकर, रमेश ठाकूर, उद्योगपती प्रशांत कारुळकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे, याचा मला अभिमान वाटतो. सोमवारी हा कार्यक्रम पार पडला.