आगामी विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशात भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. पण हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुलामनबी आझाद यांच्या पाठोपाठ आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रविवारी राज्यासाठी पक्षाच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तात म्हटले आहे की, काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते त्यांच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तडजोड करू शकत नाहीत. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना निमंत्रण न मिळाल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. याच कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काही दिवसांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राजीनामा आला आहे. सल्लामसलत प्रक्रियेत दुर्लक्ष करण्यात आल्याचे शर्मा यांनी काँग्रेस प्रमुखांना सांगितले आहे. मात्र, राज्यात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सोनिया गांधी यांना सांगितले आहे.
२६ एप्रिल रोजी सोनिया गांधी यांनी हिमाचल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, सीएलपी नेते आणि प्रचार समितीच्या अध्यक्षांसह इतर आठ समित्यांची घोषणा केली होती. ज्यामध्ये एक सुकाणू समितीही होती आणि आनंद शर्मा यांना तिचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. आशा कुमारी यांची निमंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
हे ही वाचा:
इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”
सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी
बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या
स्वाभिमान दुखावला गेला
हिमाचल प्रदेशातील दिग्गज नेत्यांमध्ये गणले जाणारे शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्रात म्हटले आहे की, पक्षाच्या कोणत्याही बैठकीसाठी त्यांचा सल्ला किंवा निमंत्रण न घेतल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. १९८२ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवणारे शर्मा आणि १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले होते.