देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तत्कालीन पंतप्रधानांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सात दोषींपैकी एकाला आज जामीन मिळाला आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने पेरारीवलन जवळपास तीस वर्षांपासून तुरुंगात असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्याचा जामीन मंजूर केला आहे.
न्यायाधीशांच्या खंडपीठाने जामीन आदेशात म्हटले आहे की, ” दोषीने तीस वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढला आहे. त्यामुळे केंद्राचा तीव्र विरोध असूनही तो जामिनावर सुटण्यास पात्र आहे, असे न्यायाधीशांचे मत आहे. “पेरारिवलन याने २०१६ मध्ये दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. यापूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने पेरारिवलनच्या शिक्षेमध्ये बदल करण्याची मागणी करणारी याचिका स्वीकारण्यास नकार दिला होता. या प्रकरणात माफी देण्याचा अधिकार राज्यपालांना नाही, असे म्हणत केंद्र सरकारने पेरारिवलन यांच्या याचिकेला विरोध केला होता. पेरारिवलन याने याचिकेत म्हटले आहे की, त्याच्या सुटकेचा अर्ज बराच काळ राज्यपालांकडे प्रलंबित असून त्यावर निर्णय होत नाही. या याचिकेवर पुढील महिन्यात कोर्टात सुनावणी होणार आहे.
पेरारिवलन सध्या पॅरोलवर बाहेर आले आहेत. त्याने पॅरोल अंतर्गत जामीन मागितला होता, तर पॅरोलवर जमीन मिळाल्याने त्याला घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पेरारिवलन याला वयाच्या १९ व्या वर्षी तुरुंगात जावे लागले होते. सध्या त्याने वयाची पन्नास वर्षे ओलांडली आहेत. पेरारीवलन तुरुंगात असताना त्याच्या चांगल्या वर्तनाच्या कारणावरूनही सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने मे १९९९ च्या आदेशात पेरारिवलन, मुरुगन, संथन आणि नलिनी या चार दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यांनतर १८ फेब्रुवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलन, संथन आणि मुरुगन यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. केंद्र सरकारने दया याचिका निकाली काढण्यास अकरा वर्षांचा विलंब केल्यामुळे न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय घेतला होता.
हे ही वाचा:
नवाब मलिकसारखी व्यक्ती मंत्रिमंडळात होती, याचे बाळासाहेबांना काय उत्तर देणार?
माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांच्या मुलीने केली ही दमदार कामगिरी
मलिकांवर आरोप गंभीर, तरी पाठीशी पवार खंबीर
नवाब मलिकसारखी व्यक्ती मंत्रिमंडळात होती, याचे बाळासाहेबांना काय उत्तर देणार?
राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान एका महिला आत्मघाती बॉम्बरने राजीव यांची हत्या केली होती. धनू असे राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. धनूसह १४ जणांचा मृत्यू झाला होता. एखाद्या सर्वोच्च नेत्याला मारण्यासाठी आत्मघातकी बॉम्बचा वापर करण्यात आलेली गांधींची हत्या ही देशातील पहिलीच घटना असावी.