उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आनंदराव अडसूळ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे.
आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार होते. अमरावती लोकसभा मतदारसंघातून ते निवडून यायचे. परंतु अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. दरम्यान त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत राजीनाम्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना दिले आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ईडीने केलेल्या कारवाईवेळी आणि आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राजीनाम्यानंतर आनंदराव अडसूळ एकनाथ शिंदेंसोबत जाणार का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ हा आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री भगवंत मान बनणार ‘दुल्हेराजा’
नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक
‘नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे’
वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!
दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मत करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आमदारांनंतर खासदारांच्या मनातील नाराजी बाहेर येऊ लागल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शाखा क्रमांक ३ चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि शाखा क्रमांक १२ चे शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामणकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला.